क्षमतेपेक्षा जास्त वजनाच्या मालाची वाहतूक ; ५४८ वाहनांवर कारवाईचा बडगा...
पनवेल, दि.30 (वार्ताहर) : वाशी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) कार्यालयाच्या वायुवेग पथकाने गेल्या सहा महिन्यांत रस्त्यावरुन (ओव्हर लोड) क्षमतेक्षा जास्त वजनाची वाहतूक करणार्या 548 वाहनांवर कारवाई केली असून, या वाहन चालकांकडून 1 कोटी 47 लाख 32 हजार 500 रुपये इतकी दंड वसुली केली आहे.
व्यावसायिक वाहनांना मालाची वाहतूक करण्यासाठी परिवहन विभागाने वजन क्षमता आखून दिली असून, त्याप्रमाणे मालाची वाहतूक करणे बंधनकारक आहे. मात्र, नवी मुंबई शहरात परिवहन विभागाचे नियम पायडळी तुडवत (ओव्हर लोड) क्षमतेपेक्षा जास्त वजनाच्या वाहनांची मोठी वाहतूक सुरु असते. यामध्ये खडी, वाळू आणि डेब्रिज असलेल्या वाहनांचा भरणा अधिक असतो. अतिक्षमतेने वजन भरल्याने वाहनांचा अपघाता हेाण्याची शक्यता जास्त असते. दुसरीकडे न्यायालयाने देखील क्षमतेपेक्षा जास्त वजनाच्या मालाची वाहतूक करणार्या वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे वाशी आरटीओ कार्यालयाच्या वायुवेग पथकांनी क्षमतेपेक्षा जास्त वजनाच्या मालाची वाहतूक करणार्या वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. एप्रिल-2021 ते सप्टेंबर-2021 या सहा महिन्यात एवूण क्षमतेपेक्षा जास्त वजनाच्या मालाची वाहतूक करणार्या 548 वाहनांवर वाशी आरटीओ कार्यालयाच्या वायुवेग पथकांनी कारवाई केली असून, या वाहन चालकांकडून 1 कोटी 47 लाख 32 हजार 500 रुपये इतकी दंड वसुली केली आहे.
क्षमतेपेक्षा जास्त वजनाच्या मालाची वाहतूक करणार्या वाहनांवर कारवाई करण्याचे सत्र यापुढेही सुरुच राहणार आहे, अशी माहिती वाशी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी दिली.