चित्रपट निर्मात्याकडे खंडणी मागणाऱ्या सोसायटीचा अध्यक्ष व मॅनेजर विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल .....
चित्रपट निर्मात्याकडे खंडणी मागणाऱ्या सोसायटीचा अध्यक्ष व मॅनेजर विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल ..... 

पनवेल दि.22 (वार्ताहर)-  आई-वडिलांच्या नावावर असलेल्या कार्यालयाची कागदपत्रे देण्यासाठी एका चित्रपट निर्मात्याकडे 30 हजार रुपयांची मागणी करुन निर्मात्याकडून 10 हजार रुपये स्विकारणाऱया एपीएमसीतील पुनित चेंबर्स या सोसायटीच्या चेअरमन व मॅनेजर या दोघां विरोधात एपीएमसी पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.  
या प्रकरणातील तक्रारदार सुदिप पांडे हा चित्रपट निर्माता असून सध्या तो तळोजा येथे रहण्यास आहे. सुदिपच्या आई वडिलांच्या नावाने एपीएमसी सेक्टर-18 मधील पुनित चेंबर्स या इमारतीत 116 क्रमांकाचे कार्यालय असून सदर कार्यालयावर नॉमिनी  म्हणून सुदिपचे नाव आहे. गत एप्रिल व मे महिन्यामध्ये सुदिपच्या आई-वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर सुदिपच्या बहिणींनी त्याला सदर कार्यालयाची कागदपत्रे न दिल्याने सुदिपने गत जून महिन्यात पुनित चेंबर्स सोसायटीचे मॅनेजर मेनन यांची भेट घेतली होती. तसेच त्याच्या आई वडिलांच्या नावाने असलेल्या ऑफिसच्या कागदपत्रांची मागणी केली होती. मात्र त्यांनी कागदपत्रे न दिल्याने सुदिप याने चेअरमन नायर यांची भेट घेतली. यावेळी नायर यांनी ऑफिसचे कागदपत्रे देण्यासाठी सुदिपकडे 10 हजार रुपयांची मागणी केली.तसेच त्यांना पैसे न दिल्यास त्याचे नुकसान करुन त्याला भाडोत्री ठेवू देणार नसल्याची धमकी दिली.  
त्यामुळे  सुदिप याने नायर यांना त्यावेळी 10 हजार रुपये दिले होते. त्यावेळी नायर यांनी मॅनेजर मेनन यांना संपर्क साधुन सुदिप पांडे याला सोसायटीचे सभासद करुन त्याच्या नावाचे शेअर सर्टिफिकेट देण्यास सांगितले होते. मात्र मेनन यांनी सुदिपचे नाव सोसायटीवर न घेता, त्याला कुठलीही कागदपत्रे दिली नाहीत. त्यानंतर सुदिपने सोसायटीचे चेअरमन व मॅनेजर या दोघांची अनेकवेळा भेट घेऊन त्यांच्याकडे कागदपत्रांची मागणी केली. मात्र त्यांनी प्रत्येकवेळी वेगवेगळी कारणे सांगुन त्याला कागदपत्रे देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे सुदिप याने या दोघां विरोधात एपिएमसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी पुनित चेंबर्स सोसायटीचे चेअरमन नायर व मॅनेजर मेनन या दोघां विरोधात खंडणीची मागणी करुन 10 हजार रुपये खंडणी स्विकारल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
Comments