विक्रांत पाटील यांचे राजकीय भविष्य उज्वल- प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील...
विक्रांत पाटील यांचे राजकीय भविष्य उज्वल ; प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील...
पनवेल दि.15 (वार्ताहर): भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी अल्पावधितच संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या कामाचा झंझावात व ठसा उमटविल्याने आगामी काळात त्यांचे राजकीय भविष्य उज्वल असून त्यांनी युवकांना घेऊन मिळालेल्या संधीचे सोने करावे अशा शुभेच्छा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी पनवेल येथील त्यांच्या जनसेवा कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी दिल्या.
           या कार्यक्रमास भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्यासह माजी मंत्री आमदार रवींद्र चव्हाण, भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, माजी कोकण म्हाडा सभापती बाळासाहेब पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर, शहराध्यक्ष जयंत पगडे, नगरसेवक नितीन पाटील, नगरसेवक हरेश केणी, बबन मुकादम, विकास घरत, भाजप युमो प्रदेश सरचिटणीस सुशिल मेगडे, प्रदेश उपाध्यक्ष अनुप मोरे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रशांत कदम, युवानेते समिर कदम, तानाजी खंडागळे, सुभाष कदम, प्रदिप देशमुख, देवीदास केळकर, राजन पिल्ले, सुनील सिन्हा, महेंद्र पाटील, भाजयुमो जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, हॅप्पी सिंग आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगितले की, बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील माझे प्रेम हे राजकीय आणि बेगडी प्रेम नाही. शिवसेना-भाजपा एकत्र येण्यासाठी तर बिलकुलच नाही, कारण आम्हाला एकत्र येण्याची इच्छाच नाही. जसा शिवसेनेचा व्यवहार त्यामुळे यांच्यासोबत काम करण्याची इच्छाच नाही. दंगलीच्या वेळी १५-१५ दिवस शिवसेना आम्हाला सुरक्षित ठेवायची त्या शिवसेनेत आणि आताच्या या शिवसेनेत फरक. आम्हाला शिवसेनेसोबत सरकार करायचे नाही आणि आम्हाला शिवसेनेसोबत निवडणुकाही लढवायच्या नाहीत, अशी बोचरी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. 

चौकट:
सर्वप्रथम युती तोडण्याची सुरुवात पनवेलमध्ये झाली. मागील महापालिका निवडणुकीत सारे काही ठरलेले असतानाही शिवसेनेने युती तोडली, परंतु त्याठिकाणी शिवसेनेची अवस्था बिकट झाली.
शिवसेनेने आम्हाला दगा दिला, परंतु येणाऱ्या काळात शिवसेनेची अवस्था काय होईल हे लवकरच पूर्ण महाराष्ट्र पाहिल, अशी जोरदार प्रतिक्रिया माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केली.


चौकट:
आई-वडिलांपेक्षा पोलीसांनीच जास्त वेळ विक्रांत पाटीलांना उचलले-
        विक्रांत पाटील आणि आंदोलन हे आता एक स्वतंत्र समीकरण बनले आहे. विक्रांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात महाविकास आघाडी सरकारच्या गलथान कारभाराविरोधात आंदोलने केली जात आहे. आजपर्यंत विक्रांतला त्यांच्या आई-वडिलांनी जेवढ्या वेळा उचलून घेतले नसेल, त्याहून जास्त पोलिसांनी आंदोलनादरम्यान उचलले आहे, अशी मिश्किल प्रतिक्रिया आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त करताच सभागृहात एकच हशा पिकला.

चौकट:
बीड मधील बलात्काराच्या घटनेबाबत संजय राऊत का बोलत नाहीत?-
         गुजरात मध्ये ३५० कोटींचे ड्रग्स सापडले असे संजय राऊत म्हणतायत. संजय राऊतांना सध्या खूप वेळ आहे, त्यांनी या संदर्भात तिकडे जाऊन आंदोलन करावे. आम्ही महाराष्ट्रात राहतो त्यामुळे महाराष्ट्रबद्दल बोला. काल बीड जिल्ह्यामध्ये ४०० जणांनी एका मुलीवर बलात्कार केला त्याबद्दल संजय राऊत का बोलत नाहीत.? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला.
               

फोटोः चंद्रकांत दादा पाटील यांचा विशेष सत्कार करताना विक्रांत पाटील व इतर मान्यवर
Comments