पनवेल परिसरातील चार वेगळवेगळ्या घटनेत चौघांचा मृत्यू .....
पनवेल परिसरातील चार वेगळवेगळ्या घटनेत चौघांचा मृत्यू .....

पनवेल, दि.16  (संजय कदम) ः पनवेल परिसरात चार वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या दुर्घटनेत चौघा जणांचा मृत्यू झाला आहे. 
पनवेल शहराजवळील हॉटेल गार्डन समोरील सिग्नलजवळून आपल्या दुचाकीवरुन रेणुकुमारी धनंजयकुमार (42 रा.कामोठे) या चालल्या असताना अज्ञात वाहनाची धडक त्यांच्या गाडीला बसल्याने झालेल्या दुर्घटनेत त्या गंभीररित्या जखमी होवून मयत झाल्या आहेत. या घटनेनंतर वाहन चालक पसार झाला आहे. 

तर दुसर्‍या घटनेत ओबेदुल्लाह हे भंगार वेचण्याचे काम करतात. ते गव्हाण फाटा परिसरात भंगार वेचण्यासाठी गेले असताना एका डंपर चालकाने माती खाली करताना कोणाला काही न सांगता डंपर वर केला. यावेळी डंपरमधील दगड डोक्याला लागून ओबेदुल्लाह अब्दुलमजीद चौधरी (42) यांचा गंभीररित्या जखमी होवून मृत्यू झाला आहे. 

तर तिसर्‍या घटनेत मुंबई-पुणे मार्गावर कामोठे येथील उड्डाणपुलाच्या सुरुवातीला घडलेल्या पहिल्या अपघातात राहुल दुर्गानंद झा (27) या तरुणाचा मृत्यू झाला. कळंबोलीतील रोडपाली भागात राहणारा राहुल झा हा आपल्या  स्कुटीवरुन मुंबईच्या दिशेने कामानिमित्त जात होता. त्याची स्कुटी पुरुषार्थ पेट्रोल पंपाजवळ च्या उड्डाणपुलाच्या चढणावर आली असताना, पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने त्याला धडक दिली. यात राहुल गंभीर जखमी झाल्याने त्याला एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्याचा मृत्यू झाला. या अपघातानंतर कामोठे पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.  तर चौथ्या घटनेत मुंबई-गोवा महामार्गावर शिरढोण गावच्या हद्दींत रस्ता ओलांडणार्‍या समर बसु मतारी (30) याचा मृत्यू झाला. मृत समर मतारी हा शिरढोण येथील जेडब्ल्युसी लॉजिस्टीक्समध्ये कामाला होता. कामावरुन सुटल्यानंतर समर मतारी हा पनवेल येथे जाण्यासाठी जयंता चौधरी याच्यासोबत मुंबई-गोवा महामार्ग ओलांडून जात होता. यावेळी पनवेल कडून पेणच्या दिशेने जाणार्‍या भरधाव इर्टिगा कारने समर मतारी याला धडक दिली. या अपघातात तो गंभीर जखमी झाल्याने त्याचा काही वेळातच मृत्यू झाला. 
या अपघातानंतर इर्टिगा कार चालकाने पलायन केले असून पनवेल शहर पोलिसांनी सदर कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे.
Comments