तळोजा विभागातील वीज, रस्ते, पाणी आदी प्रश्‍न सोडविण्याची जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्याध्यक्ष शहबाज पटेल यांची सिडकोकडे मागणी...
तळोजा विभागातील वीज, रस्ते, पाणी आदी प्रश्‍न सोडविण्याची जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्याध्यक्ष शहबाज पटेल यांची सिडकोकडे मागणी...
पनवेल, दि.29 (संजय कदम) ः पनवेल जवळील नव्याने विकसित होत असलेल्या तळोजा परिसर विभागातील अनेक महिन्यांपासून वीज, रस्ते आणि पाणी हा प्रश्‍न प्रलंबित असून सिडकोने या संदर्भात लक्ष घालून तातडीने उपाय योजना करून हा प्रश्‍न सोडवावा, अशी मागणी पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्याध्यक्ष शहबाज फारुक पटेल यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.संजय मुखर्जी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात शहबाज पटेल यांनी म्हटले आहे की, तळोजा परिसरात अनेक समस्या असून त्यामुळे येथील लोकांना खुप मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यांना नागरी सुविधा म्हणजे रस्ते, पाणी, ड्रेनेज सफाई, वीज आदी संदर्भात नाहक त्रास होत आहे. सिडकोने परिसर विकसित केला. परंतु या ठिकाणी नागरी मुलभूत सुविधा देण्यास ते कमी पडत आहेत. या परिसर मोठ्या प्रमाणात वाढत चालला असून येथील रस्त्यांना अद्यापही खड्डे आहेत. तसेच अनेक ठिकाणी सुरळीत पाणी पुरवठा होत नाही, नाले सफाई होत नाही, आरोग्याची बोंबाबोंब आहे. कित्येक ठिकाणी दर्जाहीन कामामुळे नागरिकांना जीवन जगणे असह्य बनले आहे. तरी या सर्व समस्येकडे सिडकोने लक्ष घालून त्वरित उपाय योजना करावी अन्यथा सिडको विरोधात पुन्हा एकदा आंदोलन छेडण्याचा इशारा शहबाज पटेल यांनी दिला आहे.

Comments