पनवेल वैभव वृत्तसेवा : -
कळंबोली ( दीपक घोसाळकर) : सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या कोलाड येथील द.ग.तटकरे माध्यमिक विद्यालयात गेल्या २५ वर्षापासुन कार्यरत असणारे लिपिक उदय पंढरीनाथ घोसाळकर यांना रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने आदर्श शिक्षकेतर कर्मचारी म्हणून कर्जत येथे सपत्नीक सन्मानित करण्यात आले आहे.रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह ,प्रमाणपत्र , गुच्छ शाल व श्रीफळ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आहे. त्यांना सन्मानित केल्याबद्दल रायगड जिल्ह्यातून त्यांचे शिक्षण ,सार्वजनिक व सामाजिक क्षेत्रातून अभिनंदन केले जात आहे.
रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षण क्षेत्रात आपल्या शैक्षणिक कार्याने उल्लेखनीय काम करून सामाजिक जीवनावर ठसा उमटवणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेच्या वतीने आदर्श शिक्षक व शिक्षकेतर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे .गेल्या दोन वर्षापासून कोरोना महामारी असल्याने जिल्ह्यातील आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण करण्यात आले नव्हते .मात्र यावर्षी कर्जत येथील शेळके सभागृहात सर्व नियम पाळून पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी अध्यक्षा योगिता पारधी ,जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती सुभाष घारे ,जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे ,आमदार सुरेश लाड, शिक्षक आमदार बाळाराम पाटील , शिक्षणाधिकारी जोस्तना शिंदे, डॉ. ज्ञानदा फणसे ,नीलिमा पाटील , जिल्हा परिषद सदस्य सुरेश शेठ खैरे तसेच शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर व पुरस्कारार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते . उदय पंढरीनाथ घोसाळकर हे कोलाड येथील द.ग.तटकरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात पंचवीस वर्षापासून लिपिक पदावर कार्यरत आहेत. सर्वांशी हसत मुख व स्वतःला झोकून देऊन काम करण्याच्या हातोटी मुळे त्यांनी कोलाड सामाजिक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवलेला आहे .नेहमीच सर्वांना मार्गदर्शन करून सोबत घेऊन काम करण्याची पद्धत व मनमिळावू स्वभावामुळे त्यांनी हजारो विद्यार्थी व पालकांशी आपले स्नेहाचे नाते जुळले आहे . त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा संस्था, शाळा व जिल्हा परिषद शिक्षण विभागाने दखल घेऊन त्यांना रायगड जिल्हा आदर्श शिक्षकेतर कर्मचारी म्हणून सन्मानित करण्यात आले आहे.त्यांना पुरस्कारांने सन्मानित केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष वसंत ओसवाल ,उपाध्यक्ष रविंद्र लिमये , कार्यवाह गीता पालरेचा ,सचिव रविकांत घोसाळकर, कळंबोली विद्या संकुलाचे प्रमुख राजेंद्र पालवे , माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षकेतर कर्मचारी महामंडळाचे सचिव मिलिंद जोशी ,कोलाड विद्यालयाचे प्राचार्य शिरीष येरुणकर तसेच जिल्ह्यातील शिक्षकेतर कर्मचारी संघटना पदाधिकारी यांनी त्यांचे व विद्यालयाचे अभिनंदन केले आहे.