नवी मुंबई : - आपल्या संभाषण चतुराईने लोकांना बोलण्यात गुंतवून हात चलाखीने त्यांचे दागिने लुटणाऱया एका सराईत भामट्याला गुन्हे शाखा युनिट-1 च्या पथकाने अटक केली आहे. किरण रमणिकलाल शहा (40) असे या सराईत भामटÎाचे नाव असून त्याने 125 पेक्षा अधिक लोकांची फसवणुक करुन त्यांचे दागिने लुटल्याचे उघडकिस आले आहे. या आरोपीकडून 88 ग्रॅम वजनाचे 2 लाख 68 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात गुन्हे शाखेला यश आल्याची माहिती पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांनी दिली.
या कारवाईत अटक करण्यात आलेला किरण शहा हा आरोपी अंगावर सोन्याचे दागिने असलेल्या लोकांना लक्ष्य करुन, तुम्ही एका महिलेला हात लावला आहे, तुम्ही गर्भवती महिलेला मोटार सायकलवरुन कट मारला आहे, अशी वेगवेगळी कारणे सांगून त्यांना तो आपल्या संभाषण चतुराईने बोलण्यात गुंतवायचा. त्यानंतर तो सदर महिलेला तुमच्या गळयातील चैन अथवा हातातील अंगठी दाखवून, तुम्ही ती व्यक्ती आहे किंवा नाही याची खात्री करुन येतो, अशी बतावणी करुन त्यांना दागिने देण्यास भाग पाडायचा. त्यांनतर दागिने आपल्या हातात आल्यानंतर तो सदर दागिने घेऊन पसार व्हायचा. अशाच पद्धतीने या भामट्याने गत महिन्यामध्ये ठाण्यातून एका रिक्षा चालकाला ऐरोलीत आणून ज्वेलर्सचा वजन काटा चेक करायचा आहे, अशी बतावणी करुन सदर रिक्षा चालकाच्या गळ्यातील सव्वा लाख रुपये किंमतीची सोन्याची चैन लुबाडून नेली होती.
गत जून महिन्यात देखील या भामट्याने कोपरखैरणे व तुर्भेच्या हद्दीत अशाच प्रकारे लोकांना बोलण्यात गुतंवून सोन्याचे दागिने लुबाडून नेले हेत. अशा प्रकारच्या गुह्यात वाढ होऊ लागल्याने पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह व सह पोलीस आयुक्त जय जाधव, गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त महेश घुर्ये यांनी सदरचे गुन्हे तात्काळ उघडकीस आणण्याबाबत आदेश दिले होते.
त्यानुसार गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाकडून रबाळे, कोपरखैरणे व तुर्भे भागात घडलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्याचा समांतर तपास करण्यात येत होता. त्यासाठी गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने घटनास्थळ परिसर ते कल्याण शिळफाटा रोड, मुंब्रा या भागातील सीसीटीव्ही कॅमेऱयांच्या फुटेजची तपासणी तसेच इतर तांत्रिक बाबींचा तपास केला. त्यावरुन आरोपीचे वर्णन मिळविले असता, सदरचा आरोपी हा रेकॉर्डवरील सराईत भामटा किरण रमणिकलाल शहा असल्याचे आढळुन आले.
त्यानंतर गुन्हे शाखा युनिट-1च्या पथकाने या आरोपीचा माग काढण्यास सुरुवात केला असता, तो तुर्भे परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश पाटील व त्यांच्या पथकाने तुर्भे रेल्वे स्टेशन जवळ सापळा लावून आरोपी किरण शहा याला अटक केली. त्यानंतर पोलिसांनी त्याची अधिक चौकशी केली असता, त्याने संभाषण चतुराईने लोकांना बोलण्यात गुंतवून हात चलाखी करुन रबाळे, तुर्भे, कोपरखैरणे व मुंबईतील पवई व ओशिवरा भागात केलेले फसवणुकिचे 5 गुन्हे उघडकीस आले. त्यानंतर सदर गुह्यातील 2 लाख 68 हजार रुपये किंतमीचे सोन्याचे दागिने त्याच्याकडून हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांनी दिली.
चौकट
आरोपी किरण शहा याच्यावर यापुर्वी वाशी पोलीस ठाण्यात-2, मुंबईतील वाकोला-7, भांडूप-4, बिकेसी-4, माहिम-2, एनएम जोशी मार्ग-2, व्ही.बी.नगर,अंधेरी, पंतनगर र, पवई व नेहरु नगर या पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी-1 अशा 26 गुह्यांची नोंद असली तरी या आरोपी विरोधात अशाच प्रकारचे आणखी 100 पेक्षा जस्त गुन्हे दाखल असल्याचे तपासात आढळुन आले आहे. किरण शहा हा आरोपी मुंबईतील घाटकोपर येथील मूळचा रहिवाशी असून बऱयाच गुह्यात पोलीस त्याचा शोध घेत असल्याने तसेच त्याच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट निघाल्याने तो आपल्या मूळ पत्त्यावर न राहता मुंबई व आजुबाजुच्या परिसरात वेगवेगळया लॉजिंग-बोर्डिंगमध्ये राहून वेगवेगळ्या भागात गुन्हे करत असल्याचे तपासात आढळुन आले आहे.