बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने न्यायालयाची फसवणूक करणाऱ्या दोन बोगस महिला जामीनदारांचा पोलिसांकडू शोध सुरु ...

न्यायालयात बोगस  जामीनदारांच्या माध्यमातून जामिन मिळवून देणारी टोळी पुन्हा सक्रिय  

पनवेल, दि.4 (वार्ताहर) ः छळवणुकीच्या गुह्यात अटकेत असलेल्या दोन आरोपींना दोन बोगस जामीनदार महिलांनी बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने जामिन दिल्याचा प्रकार सीबीडी बेलापुर येथील न्यायलयात उघडकिस आला आहे. विशेष म्हणजे छळवणुकिच्या गुह्यातील तक्रारदार विवाहितेने माहितीच्या अधिकारातून बोगस जामीनदार महिलांची बनावटगिरी उघडकिस आणली आहे. त्यानंतर सीबीडी पोलिसांनी न्यायालयाच्या आदेंशानुसार या प्रकरणातील दोन बोगस जामीनदार महिलांविरोधात फसवणुकिसह, बनावटगीरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे.  
दरम्यान, सीबीडी येथील न्यायालयात बनावट कागदपत्र व खोटया  नावाने आरोपींना जामिन देण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यामुळे सीबीडी येथील न्यायालयात बोगस जामीनदार आणि बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून आरोपींना जामिन मिळवून देणारी टोळी पुन्हा सक्रिय झाल्याची चर्चा न्यायालयीन वर्तुळात आहे.  
या प्रकरणात तक्रारदार प्रियंका सिंग (32) हि विवाहिता वाशी सेक्टर-29 मध्ये रहाण्यास असून लग्नानंतर काही दिवसातच तिचा सासरकडील मंडळीकडून मानसिक व शारीरीक छळ होऊ लागल्याने तिने ऑक्टोबर 2020 मध्ये पतीसह सासु-सासरे व दिर, दिराची पत्नी या सर्वांच्या विरोधात वाशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यावेळी वाशी पोलिसांनी प्रियकांच्या सासरकडील मंडळी विरोधात छळवणुकिसह विविध कलमाखाली गुन्हा दाखल करुन तिचा पती रोहित सत्यानंद सिंग (38) व दिर रतन सत्यानंद सिंग (40) या दोघांना अटक केली होती. त्यावेळी सीबीडी न्यायालयातील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकार्‍यांनी या दोन्ही आरोपींना प्रत्येकी 15 हजार रुपये वैयक्तिक जातमुचलका व तेवढयाच रक्कमेची सॉल्वन्सी देऊन जामिन मजूंरीचा आदेश दिला होता. त्यानंतर 23 नोव्हेंबर रोजी दोन्ही आरोपींनी सनोफर अरबाज खान (27) व हमिदा युसुफ खान (40) या दोन महिलांना  जामीनदार  म्हणून न्यायालयात हजर केले होते.
 त्यावेळी बोगस जामीनदार सनोफर खान व हमिदा खान या दोघींनी कल्याण नगरपरिषदेची प्रॉपर्टी टॅक्स पावती, अंबरनाथ नगरपरिषद प्रॉपर्टी टॅक्स पावती, आधारकार्ड, रेशनकार्ड  ही कागदपत्रे न्यायालयात सादर केली होती. त्यामुळे न्यायालयाने या दोन्ही आरोपींना तत्काळ जामिन मंजुर केला होता. मात्र या जामिनाबाबत तक्रारदार विवाहिता प्रियंका सिंग हिला संशय आल्याने तिने गत जानेवारी महिन्यात अंबरनाथ नगरपरिषद व कल्याण डोंबिवली महानगरपालिका व शिधावाटप अधिकारी कार्यालयात माहिती अधिकार कायद्यांतर्गत जामीनदार सनोफर खान व हमिदा खान यांनी न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रांची माहिती मागविली होती. त्यावेळी दोन्ही जामीनदार महिलांनी  जामीनकरिता सादर केलेली कागदपत्रे ही बनावट असल्याची माहिती तिला माहिती अधिकारात मिळाली.
 त्यामुळे प्रियंका सिंग हिने सीबीडी येथील न्यायालयात बोगस जामिनदार सनोफर खान व हिमदा खान यांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्याबाबत सरकारी वकीलामार्फत विनंती अर्ज केला होता. त्यानंतर न्यायाधिशांनी वाशी पोलिसांना या प्रकरणातील दोन्ही जामीनदाराच्या कागदपत्रांच्या पडताळणीचे आदेश दिले होते. त्यानुसार वाशी पोलिसांनी कागदपत्रांची पडताळणी केली असता, दोन्ही जामीनदार हे दिलेल्या पत्त्यावर रहात नसल्याचे तसेच त्यांनी सादर केलेल्या टॅक्स पावत्या आणि रेशनकार्ड देखील संबधित कार्यालयाकडून देण्यात आले नसल्याचे आढळून आले. यावरून दोन्ही जामिनदार महिलांनी रहाण्याचा खोटा पत्ता व कागदपत्रे बनावट सादर करुन न्यायालयाची फसवणुक केल्याचे पोलिसांनी दिलेल्या अहवालावरुन आढळुन आल्यानंतर न्यायालयाने बोगस जामीनदारांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.  

चौकट  
गत मार्च महिन्यात मलंग मोहम्मद शेख या व्यक्तीने बनावट नाव व बनावट कागपत्रांद्वारे आरोपीला जमीन देण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी न्यायाधीशांनी संशयावरुन त्याची कागदपत्रे तपासून त्याला सीबीडी पोलिसांच्या ताब्यात दिले होते. त्यानंतर सदर आरोपीने 4 ते 5 आरोपींना जामीन दिल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर गत जुन महिन्यामध्ये भावेश राकेश म्हात्रे (27) याने न्यायालयात बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने बांग्लादेशी महिला आरोपीला जामीन देण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर गत ऑगस्ट महिन्यात बनावट नावाने व बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने आरोपीला जामीन देण्याच्या प्रयत्नात असलेल्या इकबाल इस्माईल पटेल (47) या व्यक्तीला देखील न्यायालयाने पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते.
Comments