नवीन पनवेल परिसरात सोनसाखळी चोरट्यांचा सुळसुळाट ; महिलावर्गात भितीयुक्त वातावरण.....
पनवेल, दि. 16 (वार्ताहर) ः नवीन पनवेल परिसरात सोनसाखळी सुळसुळाट झाला असून दोन महिलांच्या गळ्यातील दागिने अज्ञात चोरट्यांनी खेचून ते पसार झाले आहेत. या घटनांमुळे सध्या महिला वर्गात भितीयुक्त वातावरण आहे.
किराणा दुकानातून साहित्य घेण्यासाठी घराच्या जवळच असलेल्या जनता किराणा स्टोअर्स सेक्टर 15 नवीन पनवेल पायी चालत जात असताना पाठीमागून चालत आलेल्या एका इसमाने जोराचा धक्का देत एका 15 वर्षीय मुलीच्या गळयातील 40 हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन जबरीने खेचून पळून गेला. याबाबत खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर दुसर्या घटनेमध्ये से.12, नविन पनवेल येथे राहणारी एक गृहिणी ही तिच्या पतीच्या गणेश मार्केट येथील दुकानात जेवणाचा डब्बा देण्यासाठी पायी चालत जात असताना नविन पनवेल गार्डनच्या आतमधून जात असतांना एक चोरटा इसमाने त्या महिलेला जोरदार धक्का देऊन त्या महिलेच्या गळ्यात असलेल्या 50,000/- किंमतीचे सोन्याचे मंगळसुत्र हिसकावून घेऊन पळून गेला. याबाबत त्या महिलेने खांदेश्वर पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली आहे. त्यानुसार खांदेश्वर पोलिसांनी त्या चोरट्यांचा शोध सुरु केला आहे.