पोलिसांच्या ताब्यात अत्याधुनिक महिंद्रा बोलेरो वाहने..
पोलिसांच्या ताब्यात अत्याधुनिक महिंद्रा बोलेरो वाहने..
पनवेल, दि.4 (संजय कदम) ः  पोलीस लवकरात लवकर एखाद्या घटनेच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी शासनामार्फत नवनवीन उपक्रम राबविले जात आहेत. त्या अंतर्गत आता पोलीस ठाण्यांना अत्याधुनिक सोयींनी युक्त अशा महिंद्रा बोलेरो जीप देण्यात आल्यामुळे पोलिसांचे काम अजून सुकर होणार आहे.
एखादा अपघात घडल्यास, आग लागल्यास किंवा एखादी दुर्घटना झाल्यास पोलिसांना संबंधित ठिकाणी पोहोचण्यासाठी कमीत कमी वेळ लागावा या उद्देशाने शासनाकडून त्यांना नव्या दमाच्या महिंद्रा बोलेरो जीप देण्यात आल्या आहेत. या जीपमध्ये एम.डी.टी. (मोबाईल डाटा टर्मिनल) ही यंत्रणा बसविण्यात आल्यामुळे संबंधित व्यक्तीने 112 नंबर वर फोन केल्यास या यंत्रणेला ते जोडले जातात. त्यामुळे कमी वेळामध्ये पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहचून तक्रारदारांना मदत करू शकतात. त्यासह इतर अनेक आधुनिक व्यवस्था या जीपमध्ये करण्यात आल्या आहेत. परिमंडळ 2 अंतर्गत असलेल्या सर्वच पोलीस ठाण्याला अशा प्रकारची बोलेरो जीप टप्प्याटप्प्याने देण्यात येणार आहे. यामुळे पोलिसांचा वेळ वाचून ते तक्रारदाराकडे अत्यंत कमी वेळातच पोहोचणार आहेत. गेल्या काही वर्षापासून पोलीस खात्याच्या चेहरा बदलण्यास सुरूवात झाली आहे. त्याअंतर्गतच पोलिसांना अत्याधुनिक वाहने कशी उपलब्ध होतील याकडे गृह खात्याचे विशेष लक्ष आहे व त्या दृष्टीने उपाय योजना केल्या जात आहेत. 

Comments