पनवेल महापालिकेने ओलांडला ५ लाख लसीकरणाचा टप्पा; नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेण्याचे आयुक्तांचे आवाहन

पनवेल, दि.७ : -  पनवेल महानगरपालिकेने पाच लाख कोविड लसीकरणाचा टप्पा ओलांडला असून आत्तापर्यंत शासकीय लसीकरण केंद्र आणि खासगी लसीकरण केंद्रावरती एकुण ५ लाख१ हजार ४१६ लसींचे डोस नागरिकांना देण्यात आले आहेत. लसींच्या उपलब्धतेनुसार लसीकरण केंद्रे वाढविण्यात येत आहेत. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त नागरिकांनी लसीरणाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे.
शासनाच्या निर्देशानुसार पहिल्या टप्प्यांमध्ये आरोग्य कर्मचारी, दुसऱ्या टप्प्यांमध्ये पहिल्या फळीवर काम करणारे कर्मचारी, तिसऱ्या टप्प्यांमध्ये 60 वर्षावरील तसेच 45 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. दिनांक 1 मे पासून 18 -44 वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरणास सुरूवात करण्यात आली होती. आज अखेर पनवेल महापालिका क्षेत्रात एकूण पाच लाख लसीकरण पूर्ण झाले आहे.
सध्या पालिका क्षेत्रात एकुण २८ शासकीय आणि ७७ खाजगी लसीकरण केंद्राना परवानगी देण्यात आली आहे. प्रत्येक शासकीय केंद्रावर रोज लसींच्या उपलब्धतेनूसार १०० ते २०० कुपन्सचे वाटप केले जात आहे. आजवर २२४६ सत्रे आयोजित करण्यात आली असून रोज सरासरी ३९०० डोस नागरिकांना दिले जातात. सद्य स्थितीत लस पुरवठा मुबलक प्रमाणात होत असल्याने दररोज पाच हजाराहून अधिक लसीचे डोस नागरिकांना दिले जात आहे.
 
पनवेल महानगरपालिकेला शासनाकडून जसे जसे लसींचा साठा उपलब्ध होईल तसे तसे विविध केंद्रावर नागरिकांसाठी लस देण्याचे नियोजन प्रशासन करते आहे. महापालिकेने शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागांवर लक्ष केंद्रित केले आहे. सध्या ग्रामीण भागात ६७ ठिकाणी लसीकरण केंद्र सुरु करण्यात आली आहे. वैद्यकिय आरोग्य विभागाचे मुख्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या १० लसीकरण टिम कार्यरत आहेत. आठवड्यातील विशिष्ट दिवशी या ठिकाणी लसीकरण केले जात आहे. 
तसेच समाजातील प्रत्येक घटकांना लसीकरणात सामावून घेण्याच्या दृष्टीने बेघर, बेवारस, वृद्धाश्रम, अंथरुणाला खिळलेले पुर्नवसन केंद्रातील मनोरुग्ण, स्मृतीभ्रंश,अर्धांगवायू रुग्ण तसेच नुकतेच फणसवाडी, चाफेवाडी या आदिवासी पाड्यांवरील नागरिकांनाही लसीकरण करण्यात आले . 
तसेच वारांगना व एचआयव्ही पॉझीटिव्ह नागरिकांसाठी काल (६ सप्टेंबर) खास लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले होते. याठिकाणी 300 लसीचे डोस देण्यात आले.

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर लसीकरण महत्वाचे असल्याने पनवेल कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयुक्त  गणेश देशमुख यांनी केले आहे.
Comments