पनवेल : "माझा प्रभाग,स्वछ प्रभाग" अंतर्गत प्रभाग १८ ला कचरा मुक्त करण्यासाठी नगरसेवक विक्रांत पाटील आणि महापालिका आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने अशोक बाग आणि लोखंडी पाडा येथे रस्त्यावर कचरा न टाकण्याबद्दल नागरिकांच्या मध्ये जनजागृती करण्याची मोहीम घेण्यात आली.नागरिकांच्या घरोघरी जाऊन त्यांना ओला, सुखा आणि जैविक कचरा वेगळा करून घंटा गाडीत टाकावा असे सांगण्यात आले.कचऱ्यामुळे रोगराई पसरते व डासांचा पण प्रादुर्भाव वाढतो हे येथील नागरिकांना समजावून सांगण्यात आले.
येथील नागरिकांच्या सेवेसाठी घंटागाडी सकाळ-संध्याकाळ अशी दिवसातून दोन वेळा फेरी मारणारा आहे. "आपला प्रभाग स्वच्छ प्रभाग" रहावा यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे आणि रस्तावर कचरा टाकू नये अशी विनंती या मोहीमे अंतर्गत करण्यात आली. याच निमित्ताने अशोक बाग आणि लोखंडी पाडा येथे डासांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून जंतुनाशक फवारणी सुद्धा करून घेण्यात आली. *माझा प्रभाग, स्वच्छ प्रभाग* या मोहिमेला यशस्वीपणे राबवायला नागरिक नक्कीच सहकार्य करतील असे मत नगरसेवक विक्रांत पाटील यांनी व्यक्त केले.