पोलीस भरतीच्या लेखी परिक्षेत तोतयेगिरी करणाऱ्या दोन परिक्षार्थ्यांवर कारवाई ...
पोलीस भरतीच्या लेखी परिक्षेत तोतयेगिरी करणाऱ्या दोन परिक्षार्थ्यांवर कारवाई ...

नवी मुंबई : -  पोलीस भरतीसाठी घेण्यात आलेल्या लेखी परिक्षेदरम्यान दोन उमेदवारांनी आपल्या प्रश्न पत्रिकांची अदलाबदल करुन परिक्षा पेपर लिहीण्यासाठी एकमेकांना मदत केल्याचे आढळुन आल्याने या परिक्षार्थींविरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करण सोमनाथ वेताळ (25) व अजित शांताराम वाघमोडे (28) अशी या दोघांची नावे असून सीसीटीव्ही फुटेजमुळे हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर या दोघांवर ही कारवाई करण्यात आली.  
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवर रिक्त असलेल्या 103 पोलीस शिपाई चालक (गट-क) व 61 पोलीस शिपाई या पदासाठी भरती प्रक्रिया सुरुवात करण्यात आली आहे. 22 सफ्टेबर रोजी पोलीस शिपाई चालक या पदासाठी 12 परिक्षा केंद्रावर लेखी परिक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर पोलीस शिपाई या पदासाठी 24 सप्टेंबर रोजी 12 परिक्षा केंद्रावर लेखी परिक्षा घेण्यात आली. या 12 परिक्षाकेंद्रापैकी खारघर सेक्टर-4 मधील एसी.पाटील कॉलेज मधील परिक्षा केंद्रावर परिक्षा चालु असतांना रुम नंबर 323 मधील करण सोमनाथ वेताळ (25) व अजित शांताराम वाघमोडे (28) हे दोन परिक्षार्थी आपसात परिक्षा पेपरची अदलाबदली करुन एकमेकांना मदत करत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करणाऱया पोलीस अंमलदारांच्या निदर्शनास आले.  
याबाबतची माहिती सदर परीक्षा केंद्रावर नियुक्त वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱयांनी सीसीटीव्ही कमेरा फुटेजची तपासणी करुन त्याबाबत खात्री केली. त्यानंतर दोन्ही परिक्षार्थ्यांकडील प्रश्नपत्रीका ताब्यात घेऊन दोन्ही परिक्षार्थ्यांना ताब्यात घेतले. या दोन्ही परिक्षार्थींनी पोलीस भरतीच्या लेखी परिक्षे दरम्यान स्वत:चा फायदा व्हावा यासाठी एकमेकांच्या परिक्षा पेपरची अदलाबदल करुन तोतयेगिरी करुन शासनाची फसवणुक केल्याचे आढळून आल्याने या दोन्ही परिक्षार्थ्याविरोधात खारघर पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

चौकट
पोलीस भरतीची लेखी परीक्षा शांततेत व निर्विघ्न वातावरणात पार पडाव्यात यासाठी सर्व 12 परीक्षा केंद्र व त्या केंद्रांपासुन 100 मीटर परिसरात सीआरपीसी कलम 144 अन्वये आदेश लागू करण्यात आले होते. तसेच सर्व परिक्षा केंद्रावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्याशिवाय लेखी परीक्षे दरम्यान होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची व्यवस्था देखील करण्यात आली होती. त्यामुळे हा गैरप्रकार उघडकीस आला.
Comments