राजे शिवाजी नगर रहिवाशी संघ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ; जिल्ह्यातून ठरतोय उत्कृष्ट मंडळ

पनवेल, दि. १६ (वार्ताहर) ः कळंबोली सेक्टर 1 मधील राजे शिवाजी नगर मंडळांची बैठक नुकतीच कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करत सामाजिक अंतराने पार पडली. कोरोनाच्या महामारीत यंदाही गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोना वैश्‍विक संकटाच्या पार्श्‍वभूमीवर कोरोना महामारी रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही याची खबरदारी घेण्याचा संकल्प मंडळानी सोडला आहे. सदर मंडळाला मनसेतर्फे आयोजित मर्यादित सार्वजनिक आरोग्यदायी गणेशोत्सव स्पर्धा 2021 या स्पर्धेमध्ये सामाजिक उपक्रमाबद्दल त्यांना पारितोषिक देवून सन्मानित करण्यात आले आहे.
विघ्नहर्ताची मूर्ती दरवर्षीच्या उंची एवढी न आणता चार फूट शाडूमातीची मुर्ती विराजमान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . मंडप नेहमी प्रमाणे असणार आहे. रोषणाई ही दरवर्षी प्रमाणे न करता मंडपा पुरतीच मर्यादित करण्यात येणार आहे. आरोग्याच्या दृष्टीने या काळात मोदक, फुटाणे,व लाडू या प्रसादाचे वाटप न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विसर्जन मिरवणुकीत कोणतेही वाद्य लावण्यात येणार नाही. विसर्जन हे तलावाच्या ठिकाणी मोजक्याच सभासदांच्या उपस्थितीत गर्दी होणार नाही याची काळजी घेतली जाईल, पनवेल महानगरपालिकेने निश्‍चित केले असेल त्याच ठिकाणी बाप्पांना निरोप दिला जाईल. कोरोना सारख्या महाभयानक आजारात मंडळांच्या वतीने घेण्यात आलेला हा महत्त्वाचा निर्णय आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या माध्यमातून समाज प्रबोधन, जनजागृती म्हणून दरवर्षी गणरायाच्या साक्षीने रंगमंचावरून थेट रसिकांसमोर प्रयोग सादर करण्याची आमच्या मंडळाची मजा काही आगळी वेगळीच. आँनलाईन प्रयोगात ते शक्य नाही. मात्र त्यामुळे रंग भूमीचं काम थांबु नये, या विचारातून आँनलाईन प्रयोगांची संकल्पना मंडळांच्या मखरात थेट अनुभवण्याची मजा, प्रयोगाआधी होणार्‍या तालमी, आयत्यावेळी केलेले आँडिशन. आजवर गाजलेले सामाजिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, भारतीय संस्कृती, आरोग्य आदी विषयावरील सादर केलेले प्रयोग, हाऊस फुल्लचा बोर्ड, आवडीच्या प्रयोगाला दाद देणारा भक्तगण रसिक, एकाच प्रयोगाला वारंवार येणारा, रिपीट आँडिशनस नाट्य प्रयोग पाहण्यासाठी जमलेल्या चाहत्यांची गर्दी अशा अनेक गोष्टींना कलाकार, आणि रसिकही या वर्षी कोरोना संसर्ग साथीच्या रोगामुळे मुकावे लागणार आहे. म्हणूनच या विषयावर नाट्य वर्तूळातल्या मंडळांनी त्यांची मत मांडली, सुरक्षित वावर आणि इतर नियम घालून ठराविक प्रेक्षक संख्येचे प्रयोग करता येतील कां ? कलाकार आणि प्रेक्षकांना कोणती काळजी घ्यावी लागेल. किंवा आँनलाईन प्रयोग या संधीचा वापर भविष्यात नाटकाचा प्रेक्षक वाढविण्यासाठी करता येऊ शकेल, असे अनेक मुद्दे या निमित्ताने उपस्थित झाले आहेत.
राजे शिवाजी नगर रहिवाशी संघ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. 2016 हे लोकमान्य टिळकांचे 160 वे जयंती वर्ष आहे, ऐतिहासिक सिंहगर्जनेला 100 वर्ष पूर्ण होत आहेत, तसेच सार्वजनिक गणेशोत्सवाला पुढील वर्षी 125 वर्ष पूर्ण होत आहेत आणि म्हणून महाराष्ट्र शासनातर्फे लोकमान्य महोत्सव साजरा करण्यात आला असता, गणेशोत्सव सजावट स्पर्धेत कोकण विभागातून व्दितीय, जिल्हा गणेशोत्सव सजावट स्पर्धेत व्दितीय, आणि तालुका गणेशोत्सव सजावट स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावला. शासनातर्फे मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत रोख रक्कम व स्मृती चषक, प्रशस्तीपत्र देवून सार्वजनिक कार्यक्रमातून गौरविण्यात आले, पोलिस आयुक्त नवी मुंबई, कर्नाळा स्पोर्ट्स क्लब, रामप्रहर, रोटरी क्लब ऑफ कळंबोली. अशा अनेक सामाजिक संस्था कडून मंडळास स्मृती चषक पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले आहे. मागील 20 वर्षांहून अधिक काळ हे मंडळ पारितोषिके पटकावत आहे.
Comments