पनवेल, दि.४ : - कोविडची दुसरी लाट आटोक्यात येत असली तरी तज्ज्ञांनी कोविडची तिसरी लाट येण्याचे भाकित केले आहे. याच पार्श्वभूमीवर आज (४ सप्टेंबर)आयुक्त गणेश देशमुख यांनी वैद्यकिय आरोग्य विभागाची आढावा बैठक घेतली. यावेळी विविध विषयांवरती चर्चा करण्यात आली.
कळंबोली येथील सीसीआय येथील गोदामांमधील 635 खाटांचे जंबो कोविड सेंटर येत्या काही दिवसात सिडको पालिकेला हस्तांतरीत करणार आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी त्याठिकाणी आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधांचा आढावा घेतला. पहिल्या व दुसऱ्या लाटेतील ऑक्सीजन तुटवडा लक्षात घेता तिसऱ्या लाटेमध्ये ऑक्सीजनचा पुरवठा कमी पडू नये यासाठी करण्यात येणाऱ्या उपाय योजना तातडीने करण्याच्या सूचना यावेळी आयुक्तांनी दिल्या.
तिसऱ्या लाटेमध्ये आवश्यक असणारे आयसीयू खाटा, ऑक्सीजन खाटा, साध्या खाटा, लहान मुलांच्या आयसीयू खाटा, ऑक्सीजन खाटा यांच्या नियोजनांवर चर्चा करण्यात आली. या अनुषंगाने खासगी रूग्णालये, शासकीय रूग्णालये तेथील सोयी सुविधा वाढविण्यावर अधिकाऱ्यांनी भर द्यावा, त्या दृष्टीने तातडीने कामास लागावे असे आदेश आयुक्तांनी यावेळी दिले.
किमान तीन महिने पुरेल एवढा औषध साठा खरेदी करून ठेवावित जेणे करून ऐनवेळी औषधांची कमतरता पडणार नाही. यासाठी प्रमुख विक्रेत्याबरोबर चर्चा करावी आणि महत्वाची औषधे खरेदी करावी अशा सूचना यावेळी आयुक्तांनी दिल्या. तसेच सीसीआय मधील स्वच्छता विभाग, विद्युत विभाग, सुरक्षा विभाग याठिकाणी लागणारे कर्मचारी याबाबत तसेच जवेण या कामांच्या निविदांचा आढावा घेऊन कामे त्वरीत पुर्ण करण्याच्या सूचना आयुक्तांनी संबधित अधिकाऱ्यांना दिल्या.
तिसऱ्या लाटेत वॉर रुम अधिक सक्षम करण्यासाठी कॉल सेंटरची सुविधा सुधारून वॉर रूम अधिक बळकट करावी. नातेवाईकांना रूग्णालयात असणाऱ्या आपल्या रुग्णांची माहिती कॉल सेंटरच्या माध्यामातून देण्यासाठीचे नियोजन वॉर रूमने करावे असे आदेश वैद्यकिय आरोग्य विभागाला आयुक्तांनी दिले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त विठ्ठल डाके, उपायुक्त सचिन पवार, सहाय्यक आयुक्त धैर्यशील जाधव, कार्यकारी अभियंता संजय कटेकर , मुख्य वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी, वैद्यकिय अधिकारी डॉ. मनिषा चांडक, अभियंता साद देशमुख, डॉ. भक्तराज भोईटे, डॉ. सुरेश पंडित, स्वप्नाली चौधरी, विजय महाले, प्राथमिक नागरी आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.