पनवेल दि. 1 (वार्ताहर) : फिल्म इंडस्टीमध्ये एनीमेशन व्हीएफएक्सचे काम करत असल्याचे भासवून एका भामटयाने खारघर मधील थ्रीस्टार हॉटेलमधील दोन डिलक्स रुममध्ये आपल्या 12 वर्षीय मुलासोबत 9 महिने बस्तान मांडून हॉटेल व रेस्टॉरंटचे तब्बल 25 लाख 15 हजार रुपयांचे बिल थकवुन मुलासह पलायन केल्याची घटना उघडकिस आली आहे. मुरली मुरुगेश कामत (43) असे या भामटयाचे नाव असून खारघर पोलिसांनी या त्याच्या विरोधात फसवणुकिचा गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे.
या प्रकरणातील आरोपी मुरली मुरुगेश कामत हा गत 23 नोव्हेंबर 2020 रोजी खारघर येथील हॉटेल थ्रीस्टारमध्ये आपल्या 12 वर्षीय मुलासोबत गेला होता. त्यावेळी त्याने हॉटेलच्या मॅनेजरला आपण फिल्म इंडस्ट्रीमध्ये एनीमेशन व्हीएफएक्सचे काम करत असल्याचे व त्याचे काम काही दिवसात सुरु होणार असल्याचे सांगितले.
तसेच त्याला 6-7 महिन्यासाठी दोन रुमची गरज असल्याचे व सध्या त्याच्याकडे पैसे नसल्याने रुमच्या भाडयाचे पैसे 1 महिन्यानंतर देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी त्याने आपले पासपोर्ट जमा करण्याची तयारी दर्शविली. त्यामुळे मॅनेजरने त्याची भेट हॉटेल मालक शेट्टी यांच्यासोबत घालुन दिल्यानंर त्यांनी देखील पासपोर्ट घेऊन मुरली मुरुगेश कामत याला हॉटेल मधील रुम देण्यास सांगितले. त्यानंतर भामटया मुरली मुरुगेश कामत याने मागणी केल्यानुसार त्याला रहाण्यासाठी व मिटींगसाठी असे दोन सुपर डिलक्स रुम देण्यात आले.
त्यानंतर भामटया मुरली मुरुगेश कामत याने हॉटेलच्या रेस्टॉरंटमध्ये खाऊन पिऊन दिवस रात्री मुलासह मौज मजा सुरु केली. एक महिना पुर्ण झाल्यानंतर मुरली मुरुगेश कामत याच्याकडे रुमच्या भाडयाची मागणी करण्यात आली असता, त्याने त्याचा आर्थिक व्यवहार पुर्ण झाल्यानंतर रुमचे भाडे देण्याचे त्याने आश्वासन दिले. काही दिवसानंतर मॅनेजरने भामटया मुरली मुरुगेश कामत याला संपर्क साधल्यानंतर त्याने खोपोली येथील इमेजिका विकत घेण्याबाबत त्याचा व्यवहार सुरु असल्याचे व सदर व्यवहार झाल्यानंतर हॉटेलचे बिल देणार असल्याचे सांगितले. याबाबतची माहिती त्याने हॉटेल मालक शेट्टी यांना देखील दिली. त्यामुळे दोन महिने त्याच्याकडे हॉटेलच्या बिलाची मागणी करण्यात आली नाही. मात्र फेब्रुवारी महिन्यामध्ये भामटया मुरली मुरुगेश कामत याने कोरोनामुळे सिंगापुर येथील डी.बी.एस.बँकेचे व्यवहार बंद असल्यामुळे बँकेमधुन पैसे ट्रान्सफर करता येत नसल्याचे कारण सांगत लॉकडाऊन संपल्यानंतर हॉटेलचे बिल देण्याचे आश्वासन दिले.
मे महिन्यात भामटया मुरली मुरुगेश कामत याला संपर्क साधल्यानंतर त्याने 3 चेक देऊन सदर चेक 15 जून नंतर बँकेत टाकण्यास सांगितले. दरम्यानच्या काळात मुरली मुरुगेश कामत याच्याकडे पैसे मागण्यासाठी अनेक व्यक्ती हॉटेलमध्ये येत असल्याचे लक्षात आल्यानंतर तो हॉटेलची फसवणुक करत असल्याचा संशय हॉटेलमधील कर्मचार्यांना आला. त्यानंतर गत 17 जुलै रोजी सकाळी 7 वाजता भामटया मुरली मुरुगेश कामत याने हॉटेलमधील बाथरुमच्या खिडकीतून मुलासह पलायन केले. हॉटेलच्या कर्मचार्यांनी भामटया मुरली मुरुगेश कामत राहत असलेल्या रूमचा दरवाजा डुप्लिकेट चावीने उघडल्यानंतर मुरली मुरुगेश कामत मुलासह पळून गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर हॉटेलच्या मॅनेजरने या भामटया विरोधात खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.