रेशन दुकानदारांना न्याय मिळवून देणे हे आमचे प्रथम कर्तव्य - शिरीष घरत
पनवेल / वार्ताहर :-
तालुक्यातील रास्त धान्य हे गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम रेशन दुकानदार नियमितपणे करीत असतात, मात्र त्यांना पुरविले जाणाऱ्या धान्याच्या गोण्यांमध्ये प्रत्येकी ५ ते १० किलोची घट येत असल्याने रेशन दुकानदारांना याचा मेळ ठेवता येणे शक्य होत नव्हते. वारंवार तक्रारी करूनही पनवेल तहसील कार्यालय तसेच संबंधित पुरवठा अधिकारी यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून रेशन दुकानदारांना त्रास देण्याचा पवित्रा अवलंबला होता. सदर बाब शिवसेनेचे रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्याकडे पोहोचल्यानंतर त्यांनी तात्काळ या घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून पदाधिकाऱ्यांना सोबत घेत आपला मोर्चा पनवेलचे तहसिलदार विजय तळेकर यांच्याकडे वळवून याबाबत सखोल चर्चा केली, तसेच नुकसानीला सामोरे जाणाऱ्या रेशन दुकानदारांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू आणि हे आम्हा शिवसैनिकांचे कर्तव्यच आहे असे आश्वासित केले. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी सुद्धा उपस्थित राहिले होते.
कधी काळी प्रतिष्ठा कमावलेला रेशन व्यवसाय आता डबघाईला आला असून, रेशन दुकाने चालविणे हत्ती पोसण्यासारखे झाले आहे. त्यामुळेच रेशन दुकाने बंद करण्याच्या निर्णयावर हे दुकानदार पोहोचले होते, मात्र गोरगरिबांचे नुकसान होवू नये या भावनेतून या दुकानदारांनी आपली दुकाने सुरू ठेवली आहेत. तालुक्यातील रेशन दुकानदारांनी पुरवठा विभागाकडे आपल्या तक्रारींचा पाढा नेहमीच वाचला आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमाच्या अंमलबजावणीमुळे राज्यात सार्वजनिक वितरण प्रणालीच्या कोट्यामध्ये मोठी कपात करण्यात आली. यामुळे रेशन दुकानदारांना दिला जाणारा धान्याचा कोटाही पूर्वीच्या तुलनेत खूपच कमी झाला आहे. परिणामी तुटपुंजे कमिशन आणि महागाईमुळे वाढता खर्च याची सांगड घालणेही रेशन दुकानदारांसाठी कसरतीचे ठरते आहे. केरोसिनचे वाटपही बंद करण्यात आले आहे. हमालीमुक्त धान्य मिळावे, केरोसिनचा कमी केलेला कोटा पूर्ववत करावा, आधारकार्डाचा तपशील गोळा करण्याचे काम रेशन दुकानदारांच्या माथी न मारता ते सरकारी यंत्रणेने करावे यासह अनेक मागण्यांसाठी रेशन दुकानदारांची संघटना सरकारकडे वेळोवेळी पाठपुरावा करते आहे. मात्र, त्याला दाद दिली जात नसल्याने रेशन दुकानदारांमध्ये नाराजी आहे. या सर्व पार्श्वभूमीवर रेशन दुकानदारांनी आपली नाराजी पुरवठा अधिकाऱ्यांकडे व्यक्त केली. रेशन दुकानदारांची ही व्यथा शिवसेनेचे रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांना समजताच त्यांनी तात्काळ पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर, जिल्हा पुरवठा अधिकारी यांची भेट घेवून यावर उचित निर्णय घेण्याचे आश्वासित केले.
यावेळी तहसीलदार विजय तळेकर यांनी रेशन दुकानदारांच्या समस्या आपण जाणून घेवून योग्य प्रकारे हाताळल्या जातील असे उपस्थितांना सांगितले. तसेच पुरवठा अधिकाऱ्यांकडून कोणत्या त्रुटी होत आहेत, याबाबतही आपण सखोलपणे चौकशी करू असा विश्वास त्यांनी यावेळी उपस्थितांच्या मनात निर्माण केला. मात्र जर तहसीलदार विजय तळेकर यांच्याकडून या घटनेचा गांभीर्याने छडा लावला गेला नाही तर आपण सरकारकडे स्वतः याचा पाठपुरावा करून रेशन दुकानदारांना न्याय मिळवून देवू, असे जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी सांगितले. यावेळी शिवसेनेचे रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्यासह उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, पनवेल तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल, पनवेल महानगरप्रमुख रामदास शेवाळे, पनवेल तालुका संघटक दीपक निकम, पनवेल विधानसभा संघटक तथा रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष भरत पाटील, समन्वयक प्रदीप ठाकूर, उपमहानगरप्रमुख दीपक घरत, ज्येष्ठ पत्रकार सुनील पोतदार, रेशन दुकानदार संघटनेचे भालचंद्र ठाकूर, शशिकांत भगत आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, रेशन दुकानदार संघटनेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.