गुन्हेगारांसाठी कर्दनकाळ ठरणारे कर्तव्यदक्ष पोलिस उपनिरीक्षक सुनील तारमळे यांच्या बदलीने पनवेलकर हळहळले

पनवेल दि. २३ (संजय कदम)- पनवेल शहर पोलिस ठाण्यात सहा वर्षांच्या कालावधीत आपल्या कर्तव्याचा व कामांचा ठसा उमटवणारे गोरगरिबांचे कैवारी व गुन्हेगारांसाठी कर्दनकाळ ठरणारे कर्तव्यदक्ष पोलिस उपनिरीक्षक सुनील तारमळे यांची ठाणे विभागात बदली झाल्याने पोलिस ठाणे सोडताना अनेकांनी त्यांची भेट घेऊन हळहळ व्यक्त केली.            
ठाणे जिल्ह्यातील शहापुर तालुक्यातील शेरेगाव येथील मुळचे रहिवाशी असलेले सुनील तारमळे यांनी आपल्याकडील जिद्दी व चिकाटीच्या बळावर वर्ष 2013 मध्ये महाराष्ट्र पोलिस दलात पोलिस उपनिरीक्षक म्हणून रुजू होण्याचा बहूमान प्राप्त केला. यानंतर नवी मुंबई पोलिस आयुक्तालयातील एपीएमसी पोलिस ठाण्यात वर्ष 2014 ते 2017 या दरम्यान व वर्ष 2018 ते 2021 मध्ये पनवेल शहर पोलिस ठाण्यात कार्यरत असतांना त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला. या कार्यकाळात दोन्ही ठिकाणी त्यांनी अनेक गुन्हयांची उकल केली. यात पनवेल शहर पोलिस ठाण्यात कार्यरत असतांना महाराष्ट्रासह इतर राज्यात घरफोडी करणाऱ्या सहा जणांच्या टोळीला जेरबंद करत 18 तोळे सोन्याचे दागिने व दुचाकीसह एकूण 3 लाख 64 हजारांचा ऐवजही हस्तगत करण्यात मोलाची भूमिका बजावली होती. यासह पनवेल तालुक्यातील नांदगाव येथे जमीनीच्या वादातून दोन महिलांची हत्या करणार्या सतीश खुटले व राजन उदरे या दोघा आरोपींना अटक करुन हा गुन्हा उघडकीस आणला होता. मोटार सायकल चोरणारे सराईत त्रिकुट, मोबाईल चोरटे, पनवेलमधील न्यु सातारा जिल्हा नागरिक सहकारी पतपेढी फोडणार्या अहमद खान व मुमताज शेख या दोघा सराईत गुन्हेगारांना तसेच प्रवाशी म्हणून ओला कॅब बुक करून चालकास लुटणार्या सराईत गुन्हेगारांना अटक केली होती. तसेच फसवणूकीप्रकरणी प्रतिक कॅटर्सच्या मालकास लोणावळ्यातून अटक केली होती. मौजमजेसाठी वाहनांची चोरी करणार्या तिघा अल्पवयीन मुलांना अटक, प्रेयसीला केटामाईन इंजेक्शन देवून हत्या करणार्या चंद्रकांत गायकर नावाच्या प्रियकरास अटक, रिक्षासह दुचाकी चोरणारा अल्पवयीन मुलास सव्वा दोन लाखांच्या ऐवजासह अटक, घरफोडी करणार्या सराईत तिघा टोळीला जेरबंद व नुकतेच पैशांच्या हव्यासापोटी एका 60 वर्षीय इसमाच्या हत्येप्रकरणी एक महिला व एक पुरूषाला त्यांनी अटक केली. अशा विविध गुन्हयांची उकल करण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. कोरोना महामारीच्या काळातही त्यांनी कौतुकास्पद काम केले आहे. त्यांनी या सहा वर्षांच्या कालावधीत वपोनि सुनिल बाजारे, वपोनि विनोद चव्हाण व सध्याचे वपोनि अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत असताना एक हुशार अधिकारी सर्वांना घेऊन चालणारा अधिकारी तसेच समाजात पत्रकार यांच्याशी चांगले संबंध असणाऱ्या अधिकारी अशी ओळख होती. त्यांच्या कारकिर्दीत गुन्हे उघडकीस आणण्याचा आलेख उंचावला होता. लवकरच त्यांना सहाय्यक पोलिस निरीक्षक म्हणून बढतीसुद्धा मिळणार आहे. याबाबत सर्व पनवेलकरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
         

फोटोः सुनिल तारमळे
Comments