आधुनिक पद्धतीचा वापर करुन महागड्या कार चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीतील सराईत गुन्हेगारांना अटक ...


चोरीच्या 13 कार हस्तगत करण्यात गुन्हे शाखेला यश  ....
पनवेल दि.४ (वार्ताहर): आधुनिक पद्धतीचा वापर करुन कारची डुप्लिकेट चावी तयार करुन त्याद्वारे महागड्या कार चोरणाऱ्या टोळीतील मुख्य आरोपीसह दोघांना गुन्हे शाखा युनिट-1च्या पथकाने अटक केली आहे. मोहम्मद तौफिक हबीबुल्ला (40) व मनोज राजेंद्र गुप्ता  (34) अशी या दोन सराईत वाहन चोरट्यांची  नावे असून त्यांनी या आधुनिक पद्धतीचा वापर करुन नवी मुंबई, मुबंई, ठाणे, मिरा भाईंदर, पिंपरी चिंचवड, राजस्थान या भागातून 24 महागड्या कार चोरल्याचे उघडकिस आले आहे. 
या गुह्यातील तब्बल 81 लाख 80 हजार रुपये किंमतीच्या 13 कार हस्तगत करण्यात गुन्हे शाखेला यश आल्याची माहिती पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांनी दिली.  
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वाहन चोरीच्या गुन्ह्यात वाढ झाल्याने वाहन चोरी करणाऱया टोळ्यांना विशेष मोहीम राबवुन पकडण्याच्या सूचना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून देण्यात आल्या होत्या. त्याअनुषंगाने गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त प्रविणकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-1चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल शिंदे व त्यांच्या पथकाने गत मार्च ते जून या चार महिन्यात घडलेल्या कार चोरीच्या गुन्ह्यातील सर्व घटनास्थळाला भेट देऊन तेथील सीसीटीव्ही फुटेज तसेच उपलब्ध माहितीचे विश्लेषण केले.  
या तपासात सर्व ठिकाणी वाहन चोरी करणारे गुन्हेगार हे एकच असल्याचे निदर्शनास आले. तसेच आज चोरलेल्या कारचा, इतर कार चोरण्यासाठी पुढील दोन तीन दिवस वापर करण्यात येत असल्याचे आढळुन आले. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने या वाहन चोरट्यांवर  वेगवेगळ्या भागात पाळत ठेवुन अखेर त्यांना जेरबंद केले. त्यानंतर गुन्हे शाखेने या दोन्ही आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांची कार चोरण्याची आधुनिक पद्धत पाहुन पोलीस सुद्धा चक्रावून गेले.  
या आधुनिक पद्धतीचा वापर करत सदर चोरट्यांनी  नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून 14, ठाणे-5, मिरा भाईंदर-2, मुंबई, पिपंरी चिंचवड आणि राजस्थान या ठिकाणावरुन प्रत्येकी 1 अशी 24 वाहने चोरल्याचे उघडकीस आले. त्यानंतर गुन्हे शाखेने या दोन्ही आरोपींची कसुन चौकशी करुन त्यांनी विविध भागातून चोरलेल्या व परराज्यात विकण्याच्या प्रयत्नात असलेल्या 13 कार हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.  
मोहम्मद तौफिक व मनोज गुफ्ता हे दोघे चोरलेल्या कार गुजरात व पश्चिम बंगाल राज्यात  विक्रीसाठी पाठवत होते. त्यानंतर तेथील टोळ्या त्यांच्या भागातील अपघातात सापडलेल्या व खराब झालेल्या वाहनांचे चेसीस नंबरनुसार कागदपत्र तयार करुन सदर कार विक्री  करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. कारची विक्री  करणाऱया टोळ्यांकडून ज्या कारची मागणी केली जाईल, त्या कारचा हे चोरटे शोध घेऊन ती आधुनिक पद्धतीने चोरुन त्यांना पाठवत असल्याचे तपासात आढळुन आले आहे.   
वाहन चोरट्यांची कार चोरण्याची आधुनिक पध्दत 
या प्रकरणातील मुख्य आरोपी मोहम्मद तौफियत हबीबुल्ला हा सराईत मोटार कार चोर असून तो मागील अनेक वर्षापासून गॅरेजमध्ये काम करत होता. त्यामुळे त्याला सर्व प्रकारच्या वाहनांच्या अंतर्गत भागाची चांगली माहिती आहे. जी कार त्याला चोरायची आहे, त्या कारची तो काच फोडून दरवाजा उघडत असे. त्यानंतर कारचे बोनट उघडून कारचे सायरन नोड बंद करत असे. त्यानंतर तो पुन्हा कारमध्ये जाऊन ओ.सी.एम. सॉकेट बनविल्यानंतर पुन्हा खाली उतरुन एक्सटर्नल वायर ने बॅटरी ते फ्युज बॉक्स जोडत असे. त्यानंतर आधुनिक पध्दतीचा टॅब वापरुन त्याला वायफायने जोडून कारचे स्वीच ऑन, ऑफ की वर चावी ठेवून कोड,डिकोड करत असे. त्याद्वारे डुफ्लिकेट चावी बनविल्यानंतर एक्सटर्नल नट बॉक्स व बॅटरीला जोडलेली वायर काढून डुफ्लीकेट चावीने तो सहज कार चोरुन नेत असल्याचे तपासात आढळुन आले आहे.  
वाहन चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई  
वाहन  चोरणाऱ्या  मुख्य आरोपी तौफिक हबीबुल्ला खान याच्यावर काशीमीरा, मानपाडा, कासारवडवली, निजामपुरा, एनआरआय, खारघर, चारकोप, सीबीडी, नालासोपारा, सायन, पलसाना, आलपेड या पोलीस ठाण्यात वाहन चोरी, बनावटगीरी व इतर प्रकारचे 15 गुन्हे दाखल आहेत. तर आरोपी मनोज गुप्ता याच्यावर बोरीवली, बोईसर व बदलापुर या पोलीस ठाण्यात वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत. या दोघांसह सदर टोळीत इतर 5 आरोपींचा सहभाग असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त डॉ.बी.जी.शेखर पाटील यांनी दिली.
Comments