पनवेल दि.०८ (वार्ताहर): ऑनलाईन आयफोन विकत घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या उरण मधील नेव्हल ऑफिसरच्या पत्नीला सायबर गुन्हेगारांच्या टोळीने ३० हजार रुपयांना गंडा घातल्याचे उघडकिस आले आहे. मोरा सागरी पोलिसांनी या प्रकणातील सायबर गुन्हेगारांवर फसवणुकिसह आयटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे.
या प्रकरणात फसवणुक झालेली विवाहिता नेव्हल ऑफीसरची पत्नी असून ती पती व मुलासह करंजा येथील नेव्हीनगर येथे रहाण्यास आहे. या विवाहितेला आयफोन विकत घ्यायचा असल्याने तीने गत महिन्यामध्ये गुगलवर त्याचा शोध घेतला होता. तसेच आपला मोबाईल फोन नंबर त्यात टाकला होता. त्यानंतर एका अनोळखी व्यक्तीने युके स्कॉटलँड देशातील डॉक्टर अॅलेक्स असल्याचे सांगून या विवाहितेला इन्स्टाग्रामवर संपर्क साधला होता. तसेच तिला हव्या असलेल्या आयफोनचे डिटेल्स देण्यासाठी तीच्याकडे व्हॉट्सऍप नंबर मागुन घेतला होता. त्यांनतर भामट्या अॅलेक्सने या विवाहितेच्या व्हॉटसऍपवर आयफोनची किंमत एक लाख ते 80 हजार पर्यंत असल्याचे सांगून तीला आयफोनच्या पार्सलचा फोटो पाठवून दिला. तसेच सदर पार्सल सोबत घड्याळ किंवा परफ्युम गिफ्ट पाठवत असल्याचे सांगितले. त्यानंतर दुसऱया मोबाईलवरुन एका महिलेने दिल्ली कस्टम ऑफीसमधुन बोलत असल्याचे सांगून या विवाहितेला संपर्क साधला. तसेच त्यांचे पार्सल आल्याचे सांगून त्यासाठी 30 हजार रुपये कस्टम ड्युटीची रक्कम भरावी लागेल असे सांगून बँकेचे डिटेल्स पाठवुन दिले. त्यानुसार या विवाहितेने 30 हजार रुपये पाठवून दिल्यानंतर सदर महिलेला संपर्क साधून त्यांच्या पार्सल बाबत विचारणा केली असता, सदर महिलेने त्यांच्या पार्सलमध्ये पैसे आढळुन आल्याने त्याबदल्यात त्यांना आणखी 1 लाख 10 हजार रुपये भरावे लागतील असे सांगितले. त्यामुळे या विवाहितेला डॉ. अॅलेक्स व सदर महिलेबाबत संशय आल्याने तीने सदर महिलेकडे आपले पैसे परत मागितले, अन्यथा पोलिसांत तक्रार करण्याची धमकी दिली. मात्र त्यानंतर देखील सदर महिलेने पैसे परत केले नाहीत. त्यानंतर आपली फसवणुक झाल्याचे विवाहितेच्या लक्षात आले. त्यानंतर तीने मोरा सागरी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. सदर तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात सायबर गुन्हेगारांविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे.