कंटेनर चालकाला मारहाण करुन लुटणारे दोघे लुटारु जेरबंद ...
कंटेनर चालकाला मारहाण करुन लुटणारे दोघे लुटारु जेरबंद ....

पनवेल, दि. ११ (वार्ताहर) ः तळोजा एमआयडीसीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या एका कंटनेर चालकाला लोखंडी सळईने बेदम मारहाण करुन त्याला लुटणाऱया दोघा लुटारूंना सुरक्षारक्षकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केल्याची घटना घडली. विकास पंडीत जाधव (20) व लहू शट्टु जाधव (22) अशी या दोघा लुटारुंची नावे असून तळोजा पोलिसांनी या दोघा लुटारुंना जबरी चोरीच्या गुह्याखाली अटक केली आहे.  
या घटनेतील जखमी कंटेनर चालकाचे नाव चंद्रवीर चौधरी (60) असे असून ते मुळचे मध्यप्रदेश येथील आहेत. तसेच ते अहमदाबाद रोड लाईन्स ट्रान्स्पोर्ट मध्ये कंटेनर चालक म्हणून काम करत आहेत. चौधरी यांनी आपल्या कंटेनरमध्ये भोपाळ मध्यप्रदेश येथून माल भरला होता. त्यानंतर सदरचा माल खाली करण्यासाठी ते तळोजा धानसर येथील रौफ इंटरप्रायजेस येथे आले होते. यावेळी चौधरी यांनी आपला कंटेनर रस्त्याच्या बाजुला उभा करुन रौफ इंटरप्रायजेस कंपनीचा पत्ता विचारण्यासाठी पायी चालत जात होते. यावेळी त्या भागात स्कुटीवरुन आरोपी विकास जाधव व लहू जाधव हे दोघे आले असता, चौधरी यांना दोघां विषयी संशय आला. त्यामुळे ते अशोक लेलँड कंपनीच्या दिशेने जाण्यासाठी निघाले.  त्यामुळे आरोपी विकास व लहू या दोघांनी चौधरी यांना पकडून मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्यांनी अशोक लेलँड कंपनीच्या भिंतीवरुन आतमध्ये उडी टाकून प्रवेश केला. त्यामुळे विकास आणि लहू या दोघांनी देखील त्यांच्या पाठीमागे भिंतीवरुन उडी टाकुन चौधरी यांना लोखंडी सळईने मारहाण केली. तसेच त्यांच्याजवळ असलेली रोख रक्कम लुटली. याचवेळी त्याठिकाणी आलेल्या सुरक्षारक्षकांनी विकास आणि लहू या दोघांना पकडले. त्यानंतर त्यांनी पोलिसांना पाचारण करुन त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर पोलिसांनी दोघांना जबरी चोरीच्या गुह्याखाली अटक केली. या मारहाणीत कंटेरन चालक गंभीर जखमी झाला असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Comments