पनवेल / वार्ताहर :- नवी मुंबई स्थित जुईनगर सेक्टर नं.२५ येथील मुळगंध विहार प्रांगणात, नवी मुंबई गुन्हे शाखेत कार्यरत असलेले उत्तमराव दासू तरकसे यांच्या सहकार्याने "सन्मान पोलीस दलाचा- सन्मान पोलीस कार्याचा" उद्देशा अंतर्गत नंदा फाउंडेशन आणि वेद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने, पोलिसांसाठी "राज्यस्तरीय नंदा संजीवन गौरव पुरस्कार" सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. संस्था अध्यक्ष स्वप्नील वाडेकर, साहित्यिक विलास देवळेकर, पोलीस अधिकारी उत्तम तरकसे, प्रताप सिंग राजपूत इत्यादी मान्यवर या पुरस्कार सोहळ्यास उपस्थित होते.
रिझर्व बँक ऑफ इंडिया निवृत्त अधिकारी नंदकुमार वाडेकर आणि ज्येष्ठ साहित्यिका संजीवनी वाडेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा सदर सन्मान राज्यातील विविध ५१ पोलीस कुटुंबियांना प्रदान करण्यात आला. पोलीस प्रशासन आणि सामान्य जनता यामध्ये असलेली दरी कमी करण्याचे कार्य, प्रत्येकाने करणे आवश्यक आहे. तसेच पोलीस कुटुंबीयांना पोलिसां समवेत सन्मानित करून त्यांच्याप्रती समाजाचे असलेले ऋण व्यक्त करणे, यासाठी "प्रत्येक शहरात- प्रत्येक जिल्ह्यात" असे राज्यस्तरीय आणि स्थानिक पुरस्कार सोहळ्याचे आयोजन होणे, काळाची गरज आहे. असे प्रतिपादन संस्थाध्यक्ष स्वप्नील वाडेकर यांनी केले.
साहित्यिक विलास देवळेकर यांनी याप्रसंगी आपल्या काव्यातून पोलीस दलासाठी संवेदना प्रकट केली. पोलीस दलाच्या वतीने प्रमुख भूमिका पार पडणारे उत्तमराव तरकसे, यांनी याप्रसंगी पोलीस दल आणि मानवता या बाबतची अनेक उदाहरणं उपस्थितांसमोर मांडली पोलीस दलात कार्यरत प्रतापराव राजपूत, यांनी आपल्या लयबध्द शैलीने सोहळ्याचे सूत्रसंचालन केले. तसेच पोलिस दलातील इतर मान्यवर याप्रसंगी विशेष उपस्थित होते. सद्य परिस्थितीचे भान राखत, शासकीय नियमांचे काटेकोरपणे पालन करीत, सदर पुरस्कार सोहळा पार पडला.