ग्राम संवर्धन, कोकण कट्टाची टीम तीन दिवसांपासून महापुरग्रस्त, दरडग्रस्त गावांमध्ये करीत आहे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
पनवेल दि.२६ जुलै :- अतिवृष्टीमुळे कोकणातील चिपळूण व महाड, पोलादपूर या तालुक्यात झालेल्या महापुराने फार मोठे नुकसान केले असून जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालेले आहे, तेथील परिस्थिती पुर्वपदावर येण्यासाठी अजून किमान महिना लागण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय रायगड आणि जिल्हा परिषद रायगड यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कोकण कट्टा (विलेपार्ले), राष्ट्र सेवा दल (रायगड) आणि ग्राम संवर्धन सामाजिक संस्था (बांधनवाडी) पनवेल यांच्या वतीने पुराचे पाणी ओसरताच कोकणकट्टाचे संस्थापक अध्यक्ष अजित पितळे, सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर आणि राष्ट्र सेवा दलाचे जिल्हा कार्याध्यक्ष संतोष ढोरे यांच्या मार्गदर्शनाखाली चोवीस जुलैपासून पुरग्रस्तांच्या तात्काळ मदतीसाठी प्रकल्प समन्वयक उदय गावंड, राजेश रसाळ, रंजीत पाटील, प्रशांत पाटील, सचिन पाटील, राजू पाटील, तेजस चव्हाण आणि गो ग्रीनचे प्रतिनिधी सलमान शेख मानिष माईन, सागर मालाप, अभिजित धनावडे ह्या कार्यकर्त्यांची टीम रायगड जिल्हा परिषदेचे जिल्हा कार्यक्रम समन्वयक जयवंत गायकवाड, सुरेश पाटील, महाड पंचायत समितीतील किशोर चांदोरकर, विस्तार अधिकारी पं स. महाड, अरुण दौंड, ग्रामसेवक नाते कोंडीवते ग्राम पंचायतीचे ग्रामसेवक चिले महाड शहरातून सर्वत्र रस्ते खचलेले असताना घटनास्थळी पोहचली. व सोबत ५०० किलो तांदूळ, ४००० पाणी बॉटल, ३३० किलो फरसाण, ७८०० बिस्किट्स पुडे, ८००, मेणबत्ती पाकिटे, माचीस बॉक्स सहित, १०० किलो डाळ, ५० किलो गोडेतेल, ५०० आंघोळीचे साबण, ५० किलो डिटर्जंट पावडर, ३०० कपडे धुण्याचे साबण,१०० किलो मीठ, ४५० टूथ पेस्ट, टूथब्रश यासारख्या वस्तूंची मदत महाड शहरात व दरडग्रस्त कोंडीवते, राजेवाडी, दादली, सवाद, आकले, बिरवाडी, बिरवाडी कुंभारवाडा, ढालकाठी या गावात जाऊन सतत दोन दिवस प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून मदत कार्य करीत आहेत. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सुजित कदम, दादा गावडे, दया मांडवकर, योगेश साटम, सुनील वनकुद्रे, जयवंत जोशी तसेच यांनी कोकण कट्टाचे सदस्यांनी अथक प्रयत्न केले. मात्र एकूणच परिस्थिती बघता खूप मोठ्या प्रमाणावर महाड शहर आणि आजूबाजूचा परिसरात नुकसान झाले आहे. वाहने, पशु प्राणी, घरे वाहून गेली आहेत. झोपडपट्टीतील लोकं आणि गुरे यांची बिकट अवस्था असून दुकानांपासून ते गोदामाणपर्यंत सर्वच्या सर्व पुराच्या भक्ष्यस्थानी गेले असून सर्वत्र गाळ पसरला असून बाजार पेठेत दुर्गंधी निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत सद्या होणारी मदत ही पुरेशी नसून संस्थेच्या वतीने अजूनही शेकडो कुटुंबांना खाद्यपदार्थ, अन्नधान्य, पिण्याचे पाणी, यासारखी मदत गोळा करून पाठविणार आहोत तरी या कार्यात मदत दात्यानी पुढे येवून पुरग्रस्त बाधंवासाठी वस्तुरूपी किंवा आर्थिक मदत करावी असे आवाहन कोकण कट्टाचे अजित पितळे आणि सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी केले आहे