कळंबोली लोखंड बाजारात पेट्रोल पंप बसवण्याची शिवसेनेची मागणी...

पनवेल, दि.१६ (वार्ताहर) ः कळंबोली येथील लोखंड पोलाद बाजार हा आशिया खंडातील सर्वात मोठा बाजार आहे. मालाची ने आण करण्यासाठी हजारो लहान-मोठी व अवजड वाहने या बाजारामध्ये ये-जा करत असतात. परंतू लोखंड बाजारामध्ये एकही पेट्रोल पंप नसल्याने वाहनचालकांची गैरसोय होत आहे. वाहनचालकांची गैरसोय टळावी या उद्देशाने आरक्षित असलेल्या पेट्रोल पंपाच्या भूखंडावर त्वरित पेट्रोल पंप बसवण्याची मागणी शिवसेना महानगरप्रमुख व वाहतूकदारांचे नेते रामदास शेवाळे यांनी केले आहे.
कळंबोली स्थित लोखंड पोलाद बाजार 302 हेक्टरवर वसला असून आशिया खंडातील सर्वात मोठा बाजार म्हणून गणला जातो. या बाजारामध्ये लोखंड पोलाद व्यापार्‍यांचे 1960 लहान मोठे व्यापारी गाळे आहेत. या ठिकाणी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर लोखंड पोलादाचा व्यापार होत असतो. त्या अनुषंगाने मालाची चढ-उतार मोठ्या प्रमाणावर होते, हजारो वाहनांची वर्दळ या बाजारपेठेत होत असते.परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असूनही बाजारपेठत आरक्षित असलेल्या पेट्रोल पंपाच्या भूखंडावर पेट्रोल पंप बसवण्यासाठी लोखंड पोलाद बाजार समितीने आज तागायत कुठल्याही  प्रकारचे प्रयत्न केलेले नाहीत. 

याठिकाणी वाहनचालकांना गाडीमध्ये माल लोड केल्यानंतर इंधन भरण्यासाठी मार्केट पासून दोन किलोमीटर लांब पनवेलच्या दिशेने असलेल्या पेट्रोल पंपावर ती जावे लागत असल्यामुळे सायन-पनवेल महामार्गावरील कळंबोली सर्कल या ठिकाणच्या वाहतूक कोंडीचा सामना या अवजड वाहनांना करावा लागत आहे. परिणामी विनाकारण वाहनचालकांना इंधन खर्ची घालावी लागत आहे. लोखंड पोलाद बाजार मध्ये जर राखीव भूखंडावर पेट्रोल पंपाची व्यवस्था झाली तर वाहनचालकांच्या वेळेची व इंधनाची बचत होणार आहे. कळंबोली तळोजा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या पेट्रोल पंपासाठीच्या आरक्षित जागेवरील भूखंड क्रमांक 450 हा 667 चौरस मीटरचा भूखंड बाजार समितीने पेट्रोल पंप चालू करावा किंवा इतर कुणासही वितरीत करून त्या ठिकाणी पेट्रोल पंप चालू करून वाहनचालकांची होणारी गैरसोय टाळावी अशी लेखी मागणी मुंबई महानगर प्रदेश लोखंड व पोलाद बाजार समिती कडे करण्यात आली आहे. यासंबंधात लोखंड पोलाद बाजार समितीचे कार्यक्रम मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकार्‍यांनी पेट्रोल पंपाचा प्रश्‍न लवकर सोडवला जाईल याचे आश्‍वासन वाहतुकदारांना दिले आहे.

कोट 
पालिका क्षेत्रामध्ये पेट्रोल पंप वाढवण्याच्या पनवेल पालिकेच्या धोरणाप्रमाणे, लोखंड पोलाद बाजार समितीनेही पेट्रोल पंपा साठी जागा आरक्षित जागेवर ती तात्काळ पेट्रोल पंप सुरू करावा. जेणेकरून वाहनचालकांच्या  वेळेची व इंधनाची बचत होईल व त्यांची गैरसोय टळेल 
रामदास शेवाळे
शिवसेना महानगरप्रमुख व माथाडी व वाहतुकदार नेते कळंबोली
Comments