पनवेल, दि.६ (वार्ताहर) ः खारघर भागात राहणार्या पिता-पुत्राने बँकेचे कर्ज असलेली त्यांची कार एका शिक्षकाला विकुन त्याची 3 लाख 70 हजार रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे या पिता-पुत्राने कारवर वुठल्याही बँकेचे कर्ज नसल्याचे बनावट आरसी बुक देखील या शिक्षकाला दिल्याचे निदर्शनास अअले आहे. खारघर पोलिसांनी या पिता पुत्रावर फसवणूक तसेच बनावटगिरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
सदर प्रकरणात फसवणूक झालेल्या शिक्षकाचे नाव आफाक अहमद मुश्ताक अहमद जमादार असे आहे. तर त्यांची फसवणूक करणार्या पिता-पुत्राचे नाव वहीद सियतअली शेख आणि वसीम वहीद शेख अशी आहेत. आफाक जमादार कोल्हापूर येथे शाळेत शिक्षक आहेत. आफाक यांना सेकंडहॅन्ड कार खरेदी करायची असल्याने त्यांनी ओएलएक्सवर कारची शोधाशोध सुरु केली होती. त्यावेळी नोव्हेंबर महिन्यामध्ये त्यांना ओएलएक्सवर रिनोल्ट डस्टर कार विकण्यासाठी असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी कार मालक वसिम शेख याला संपर्क साधला होता. त्यावेळी वसीम शेख याने सदर कार त्याच्या वडिलांच्या नावावर असून कारवर कुठल्याही बँकेचे कर्ज नसल्याचे सांगितले होते. तसेच कारची कागदपत्रे सुध्दा दाखविली होती. त्यानुसार त्यांच्यात 2 लाख 80 हजार रुपयांमध्ये कार खरेदी-विक्रीचा व्यवहार ठरला. त्यानंतर काही दिवसांमध्ये वसिमला 2 लाख 80 हजाराची रक्कम दिल्यानंतर वसिम शेख याने आफाक जमादार यांना खारघर मधील उत्सव चौकात कार आणि कारची कागदपत्रे दिली. त्यानंतर आफाक यांनी कार कोल्हापूर येथे नेऊन 1 लाख रुपये खर्च करुन तिची दुरुस्ती करुन घेतली. मात्र, आफाक यांना अचानक आर्थिक अडचण आल्याने त्यांनी महिन्याभरातच सदर कार 3 लाख 50 हजार रुपयांमध्ये विक्रीसाठी काढली. त्यासाठी आफाक आरटीओ कार्यालयात गेल्यानंतर कारवर आयडीएफसी फस्ट बँकेचे कर्ज असल्याचे त्यांना समजले. त्यानंतर वसीम शेख आणि वहीद शेख यांनी फसवणूक केल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर जमादार यांनी खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार खारघर पोलिसांनी वसीम शेख आणि वहीद शेख या पिता-पुत्रावर गुन्हा दाखल केला. दरम्यान, आफाक यांनी विकत घेतलेल्या कारचे आयडीएफसी फस्ट बँकेचे हफ्ते थकल्याने, कार बँक जप्त करुन नेण्याची भिती असल्याने आफाक यांना सदर कार वापरताही येत नाही. तसेच तिची विक्री सुध्दा करता येत नसल्यामुळे त्यांची पंचायत झाली आहे.