मोबाईल चोरणार्‍या सराईत गुन्हेगारास डॉक्टराने पकडले...


पनवेल, दि.3 (वार्ताहर) ः लोकलमधून प्रवास करीत असलेल्या डॉक्टरांच्या हातातील 75 हजार रुपये किंमतीचा मोबाईल खेचून चालत्या लोकलमधून उडी मारुन पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या चोरट्याला डॉक्टरांनी पाठलाग करून पकडल्याची घटना पनवेल रेल्वे स्थानकात घडली आहे.
नवीन पनवेल येथे राहणारे डॉ.साईप्रसाद फाजगे (25) हे मुलुंड येथील महापालिका रुग्णालयात कार्यरत आहेत. ते नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी पनवेल रेल्वे स्थानकात आले होते. पनवेल-ठाणे लोकलमध्ये बसले असताना लोकल सुरूच होताच डब्यात चढलेल्या आरोपी फिलीप्स स्टिफन (22) याने त्यांचा महागडा मोबाईल खेचून धावत्या लोकलमधून उडी मारुन पलायन करत होता. यावेळी डॉ.साईप्रसाद यांनी सुद्धा उडी मारुन त्याचा पाठलाग करून त्याला पकडले व रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले. या त्यांच्या धाडसाबद्दल सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
Comments