महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी सारस्वत बँकेतर्फे १ कोटींची मदत...
 
पनवेल, ता.२९ (प्रतिनिधी) सहकार क्षेत्रातील अग्रगण्य बँकेंमध्ये समाविष्ठ असलेल्या सारस्वत बँकेतर्फे कोकण, कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात, विदर्भ आणि इतर सर्व विभागांतील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी रु.१ कोटींचा निधी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'स देण्याचा निर्णय बँकेच्या संचालक मंडळाने घेतलेला आहे. 
 
कोकणातील रायगड, महाड, खेड, संगमेश्वर, चिपळूण, रत्नागिरी तसेच कोल्हापूर, सांगली, पश्चिम महाराष्ट्र आणि इतर सर्व विभागांत आलेल्या महाभयंकर जलप्रकोपामुळे अनेक लोक मृत्युमुखी पडले आहेत. अतिवृष्टी, समुद्राला आलेली भरती आणि धरणाच्या पाण्याच्या विसर्गामुळे अनेक गावांतील पाण्याची पातळी वाढून गावं जवळजवळ १० फूट पाण्याखाली गेली. घरात पाणी शिरल्याने रहिवाश्यांचे संसार मातीमोल झाले आहेत. जनजीवनासोबत, उद्योगधंदे तसेच शेतीचेही प्रचंड नुकसान झाले आहे. पूर ओसरल्यानंतर उद्भवणाऱ्या रोगराईचा सामना करण्यासाठी, पूरग्रस्त महाराष्ट्रातील जनतेला या नैसर्गिक आपत्तीतून सावरण्यासाठी व त्यांचे पुरामुळे विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी शासनातर्फेही विविध योजना राबविल्या जात आहेत. 
 
बँकेचे अध्यक्ष श्री. गौतम एकनाथ ठाकूर, उपाध्यक्ष श्री. शशिकांत साखळकर, जेष्ठ संचालक श्री किशोर रांगणेकर व मुख्य महाव्यवस्थापक श्री अजय कुमार जैन यांनी नुकतीच महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे यांची 'मातोश्री' निवासस्थानी भेट घेऊन 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी' चा रुपये एक कोटींचा धनादेश त्यांना सुपूर्त केला. 
 
सारस्वत बँक ही महाराष्ट्राची हक्काची बँक आहे. महाराष्ट्रातील जनतेसाठी बँकेने यापूर्वीही अनेक बिकट परिस्थितीत सर्वोतोपरी योगदान दिले आहे. कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी' रुपये एक कोटींची मदत असो व दुष्काळग्रस्तांसाठी रुपये एक कोटींची मदत किंवा २६/११च्या आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिसांच्या कुटुंबियांना बँकेत नोकरी देऊन बँकेने दिलेला आधार. समाजाचे आपण नेहमी देणे लागतो, त्यांचे ऋण आपल्याला वेळोवेळी फेडावे लागते, याचे भान सारस्वत बँकेने नेहमीच ठेवले आहे. आपली सामाजिक बांधिलकीची परंपरा जपणाऱ्या सारस्वत बँकेने पुन्हा एकदा एक पाऊल पुढे टाकत ह्या जलप्रकोपात उध्वस्त झालेल्या पूरग्रस्त बांधवांसाठी मदतीचा हात पुढे करून त्यांना पुन्हा एकदा पूर्वपदावर आणण्यासाठी हातभार लावण्याचे ठरविले आहे. महाराष्ट्रावरील या नैसर्गिक आपत्तीला एकजुटीने सामोरे जाऊन  पूरपरिस्थितीवर मात करू असा संदेश सारस्वत बँकेने पुन्हा एकदा समाजाला दिला आहे.
Comments
Popular posts
महापालिकेच्यावतीने बावन बंगला परिसरातील अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई...
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेच्या २८ व्या वर्धापनदिन दिनानिमित्त बबनदादा पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचे होणार थाटात उद्घाटन...
Image
आमदार विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल विधानसभा क्षेत्रात सामाजिक उपक्रमांची मालिका; 'बुके' नव्हे 'बुक' संकल्पनेतून सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरा...
Image
आईशा मदरसा तर्फे रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा संपन्न ...
Image
आमदार विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभुदास भोईर यांच्यावतीने रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रम ...
Image