पनवेल दि.२३ (वार्ताहर)- ‘‘नेमेची येतो मग पावसाळा’’ असे म्हणताच दि. बा. पाटील नगर (52 बंगला) वासीयांच्या हृदयात धडकी भरते. जेव्हा नॅशनल हायवे 4 बी कामोठे ते उरण रोड निर्माण झाला. त्यावेळेपासुन हा रोड पावसाचे समुद्राकडे जाणारे पाणी हे बंदराकडे प्रवाहित करतो. ह्या बरोबर नदीपात्रात झालेले अतिक्रमण, आजुबाजुला झालेले भराव, पुलाची अपुरी पोकळी अशा अनेक मानव निर्मीत कृत्यांमुळे दरवर्षी दि. बा. पाटील (52 बंगला) नगरवासीय हे मुसळधार पाऊस पडला की हमखास पुरात बुडून जातात.
या परिसरात विकास व्हायलाच हवा पण विकास करणार्या सरकारी यंत्रणेला दुरगामी दुष्परिणामांची शुध्दच नसते. दरवर्षी बूडून जाणे हेच काय ते दि. बा. पाटील (52 बंगला) नगरवासीयांच्या नशीबात आहे. अनेकांनी ह्या व्यथा मांडण्याचा आटोकाट प्रयत्न केला, करत आहेत पण महानगरपालिका प्रशासन, सिडको ह्यावर कायम स्वरुपी काहीच उपाययोजना करताना दिसत नाहीत. उलट आता विमानतळ आणि करंजाडे वसाहत इत्यादी विकास कामांमुळे यापुढे परिस्थिती अजून भयानक होणार आहे. जिवीत हानी/ वित्तीय हानी हे सर्व टाळण्यासाठी पावसाळी पाणी जे बंदराकडेच एकत्रीत होत आहे. ते अनेक मार्ग वेगळे करुन नॅशनल हायवे 4 बी च्या पलीकडे जाईल असे महानगरपालिका आणि सिडको प्रशासनाने करावे. अन्यथा पनवेल शहराचा एक भाग नकाशावरुन नाहीसा होईल, अशी भिती दि. बा. पाटील (52 बंगला) नगरवासीय व्यक्त करीत आहेत.
तरी परिस्थितीचे गांभिर्य ओळखून पनवेल महापालिका आणि सिडको प्रशासनाने सदर जागेची प्रत्यक्ष पहाणी करुन पुराचे पाणी दि. बा. पाटील नगरात (52 बंगला सोसायटीत) तुंबणार नाही याबाबत योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी या परिसरातील नागरिक करीत आहेत.
फोटोः दि. बा. पाटील नगर