कळंबोली येथे शेकडो दुचाकीस्वारांना हेल्मेटचे वाटप
माजी म्हाडा सभापती बाळासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती
पनवेल / प्रतिनिधी : -
महाराष्ट्र आम्ही एकत्र श्रमिक संघटना, महाराष्ट्र प्रदेश वाहतूक संघटना अध्यक्ष प्रभुदास भोईर आणि प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने आमदार विक्रांत बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रस्ता सुरक्षेविषयी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी कळंबोली सर्कल येथे करण्यात आले. यावेळी माजी म्हाडा सभापती बाळासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार विक्रांत पाटील यांच्याहस्ते शेकडो दुचाकीस्वारांना हेल्मेटचे वाटप करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आमदार विक्रांत पाटील यांनी बोलताना सांगितले की, वयाच्या सोळाव्या वर्षांपासून समाजकारणात काम करणारा मी कार्यकर्ता आहे, आणि त्यामुळे सामाजिक उपक्रमातून कार्यक्रम केले पाहिजे या धोरणाला धरून माझ्या वाढदिवसानिमित्त प्रभुदास भोईर यांनी आयोजित केलेला हेल्मेट वाटप कार्यक्रम नक्कीच एक नवी ऊर्जा देणारा आहे. हेल्मेटचे नुसते वाटप करून चालणार नाही तर त्याचे महत्व पटवून दिले पाहिजे, आणि प्रभुदास भोईर यांच्या माध्यमातून रस्ता सुरक्षेसाठी जसं चारचाकी वाहन चालकांना सिटबेल्ट लावणं गरजेचं आहे, त्याप्रमाणे दुचाकीस्वारांना हेल्मेट किती महत्वाचं आहे, हे त्यांनी सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जेव्हा अपघात होतो, त्यावेळी दुचाकीस्वारांना डोक्याला गंभीर दुखापती होऊन मृत्यूचे प्रमाण अधिक असल्यामुळे हेल्मेट हे दुचाकीस्वारांच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्वाचे असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.