मालमत्ता कर भरण्यासाठी बँका, पतपेढीमध्ये मिळणार सुविधा...

पनवेल /(प्रतिनिधी) :- मालमत्ता कर भरण्यास नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी बँका, तसेच पतपेढीमध्ये सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी पनवेल महानगरपालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांनी नागरिकांच्या सुचनेनुसार केली होती, त्या अनुषंगाने महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी तशा प्रकारची सुविधा उपलब्ध करून देण्यास सहमती दर्शवली आहे. 
           पनवेल महानगरपालिका हद्दीतील मालमत्ता धारकांना मालमत्ता कर भरण्यास ऑनलाईन सुविधा उपलब्ध आहे. मात्र सर्वच ज्येष्ठ नागरिक तसेच महिला वर्गाला ऑनलाईन पद्धतीचा वापर करणे शक्य होत नाही. त्यामुळे वेळेवर कर भरण्यास त्यांना अडचणी येत असतात. अशा परिस्थितीत त्यांच्याकडे दुसरा पर्याय उपलब्ध असावा यासाठी अनेक ज्येष्ठ नागरिक व महिलांनी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्याकडे आपली सूचना वजा समस्या मांडली होती. त्या अनुषंगाने सभागृहनेते परेश ठाकूर यांनी गुरुवारी (दि. २२) आयुक्त गणेश देशमुख यांची भेट घेऊन नागरिकांची हि गैरसोय त्यांच्यासमोर मांडली. वीज किंवा इतर देयक भरण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया असते, मात्र तेथेही अनेक वीज ग्राहकांना देयक भरता येत नाही. त्यामुळे वीज वितरण कंपनीने बँका तसेच पतपेढींना तसा अधिकार दिला आहे. त्याचप्रमाणे मालमत्ता कर भरण्यास बँका व पतसंस्थेमध्ये सुविधा उपलब्ध करून दिल्यास वेळेवर कर भरणा करण्यास मदत होणार आहे व त्याचा फायदा नागरिकांना होणार आहे. त्यामुळे अशाप्रकारची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी केल्यानंतर आयुक्त गणेश देशमुख यांनी यावर सहमती दर्शवत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधितांना दिले आहेत. त्यामुळे ज्यांना ऑनलाईन कर देयक भरता येणार नाही अशा मालमत्ता धारकांना हा एक चांगला पर्याय उपलब्ध होणार आहे. 
Comments