इनरव्हील क्लबच्या डिस्ट्रिक्ट चेअरमनपदी पॅनेशिया च्या संचालिका संतोष सिंग यांची निवड....
पनवेल / वार्ताहर :- सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असणाऱ्या इनरव्हील क्लबच्या डिस्ट्रिक्ट ३१३ च्या डिस्ट्रिक्ट चेअरमन पदी पॅनेशिया हॉस्पिटलच्या संचालिका संतोष सिंग यांची निवड करण्यात आली आहे.१ जुलै रोजी ऑनलाईन प्रणालीद्वारे पार पडलेल्या या सोहळ्यात त्यांनी चेअरमन पदाची सूत्रे स्वीकारली. ३७ व्या डिस्ट्रिक्ट असेम्ब्ली(संजोग) च्या या कार्यक्रमात ५०० हून अधिक सदस्यांनी सहभाग नोंदवला.पनवेल मध्ये इनरव्हील क्लब या संस्थेचे चार क्लब कार्यरत आहेत. या चारही क्लबमधून इनरव्हील क्लब ऑफ नवीन पनवेल च्या सदस्य असणाऱ्या संतोष सिंग यांनी पनवेल मधून सर्वात प्रथम डिस्ट्रिक्ट चेअरमन बनण्याचा बहुमान पटकावला आहे.त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून.यशस्वी कारकिर्दीच्या साठी शुभेच्छा देणाऱ्यांची रीघ लागली आहे.
    
मावळत्या डिस्ट्रिक्ट चेअरमन अनुराधा चांडक यांनी चालू वर्षासाठी डिस्ट्रिक्ट चेअरमन पदाची सूत्रे संतोष सिंग यांना बहाल केली.या कार्यक्रमाकरीता गेस्ट ऑफ ऑनर म्हणून खासदार तथा उत्तर प्रदेश च्या माजी राज्य मंत्री अनुप्रिया पटेल झूम मीटिंग मध्ये ऑनलाईन उपस्थित होत्या.तर अध्यक्ष स्थानी इनर व्हील क्लबच्या असोसिएशन अध्यक्षा सरोज कटियार उपस्थित होत्या.सध्या आशिया खंडातील भारत, नेपाळ,श्रीलंका आणि बांगलादेशातील २७ डिस्ट्रिक्ट चे नेतृत्व सरोज कटीयार करत आहेत. डिस्ट्रिक्ट चेअर मन म्हणून संतोष सिंग रायगड,पुणे,अहमदनगर,औरंगाबाद,लातूर,नांदेड,सोलापूर,सातारा या जिल्ह्यांतील ७५ क्लबचे नेतृत्व करणार आहेत.
      यावेळी डिस्ट्रिक्ट व्हॉईस चेअमनपदी रचना मालपाणी यांची नियुक्ती करण्यात आली,तर डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी पदी डॉ शोभना पालेकर, डिस्ट्रिक्ट ई एस ओ पदी मुक्ती पानसे, खजिनदार पदी लता शिवशंकर, डिस्ट्रिक्ट आय एस ओ पदी डॉ आशा देशपांडे, डिस्ट्रिक्ट एडिटर पदी डॉ दीपशिखा पाठक यांनी पदे ग्रहण केली.
     
यावेळी पदग्रहण सोहळ्याला उपस्थितांना मार्गदर्शन करताना खासदार अनुप्रिया पटेल म्हणाल्या की एकविसाव्या शतकात सुद्धा आपल्याला महिला सक्षमीकरण, महिला सन्मान, आणि महिला समानतेची चर्चा करावी लागते ही शोकांतिका आहे. महिला सबलीकरण करण्यासाठी समाजाने घरातील मुलांना संस्कार दिले पाहिजेत. परंतु होते उलटेच! बंधने ही घरातल्या मुलींवर लादलेली असतात.तिने कपडे कसे घालावेत याबाबत बंधने घातली जातात. येण्याजण्याच्या वेळांचे बंधन फक्त मुलींवर असते.शिक्षणापासून ते उठण्या बसण्यापर्यंत मुलींवर पालकांचा अंकुश असतो.असाच अंकुश पालकांनी मुलांवर ठेवला तर महिला अत्याचाराचे प्रमाण कमी होईल.आजही धमक नसलेल्याची तुलना हातात बांगड्या भरण्याशी करण्यात येते. हरलेल्या व्यक्तीची तुलना, बायकांच्या सारखा काय रडत बसला आहे? असे म्हणून करण्यात येते. अशा विचारांतून समाज कसा काय महिला सक्षमीकरण करणार आहे? स्त्री कुठल्याच क्षेत्रात कमी नाही हे समाजाला निक्षून सांगायचे आहे आणि ते देखील आपल्या कर्तृत्वातून दाखवून द्यायचे आहे.
      
मावळत्या डिस्ट्रिक्ट चेअरमन अनुराधा चांडक यांनी संतोष सिंग यांच्या कार्याचा गौरव केला.तसेच त्यांच्या सारखे कार्यकुशल, सर्वसमावेशक आणि मितभाषी नेतृत्वामुळे क्लब च्या कामगिरीचा आलेख चढताच राहील असा विश्वास व्यक्त केला. आपल्या भावना व्यक्त करताना संतोष सिंग यांनी कुटुंबातील सदस्य आणि क्लब मधल्या सहकारी सदस्या यांच्या सहकार्यामुळेच मी या पदी विराजमान होऊ शकले आहे असे म्हटले. त्या पुढे म्हणाल्या की संस्थेच्या अध्यक्षा सरोज कटियार यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे त्या विश्वासास मी नक्कीच पात्र ठरेन. त्यानंतर संतोष सिंग यांनी उपस्थितांसमोर क्लब करणार असणाऱ्या अनेक उपक्रमांचे बाबत सादरीकरण केले. यामध्ये महिलांचे आरोग्य,शिक्षण आणि रोजगार यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच क्लब ने केलेल्या उत्तमोत्तम उपक्रमांचा आढावा उपस्थितांसमोर सादर केला.

या शानदार कार्यक्रमाच्या आयोजनासाठी इनरव्हील क्लब ऑफ न्यू पनवेल ने अथक परिश्रम घेतले. नवीन पनवेल क्लबच्या अध्यक्षा नम्रता सचदेव यांच्या मार्गदर्शनाखाली कन्व्हेयर  मोना जेठवा, को कन्व्हेयर सुषमा कर्णिक, स्मृती विश्वास यांनी परिपूर्ण नियोजन करीत कार्यक्रम यशस्वी करण्यात सिंहाचा वाटा उचलला.

चौकट
संतोष सिंग या पनवेलमधील सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ सुभाष सिंग यांच्या पत्नी आहेत. त्या सध्या पॅनेशिया हॉस्पिटल च्या संचालिका असून इंडो हेल्थ फाऊंडेशन च्या विश्वस्त आहेत.रुग्णालय प्रशासन यात त्यांनी मास्टर्स केले आहे.रोटरी क्लब ऑफ न्यू पनवेल च्या पहिल्या महिला सदस्य होण्याचा बहुमान त्यांनी पटकावला आहे.वैद्यकीय क्षेत्रात सेवाभावी वृत्तीने काम करत असल्याबद्दल गेल्या वर्षी त्यांचा पनवेलच्या महापौरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यापूर्वी त्यांनी बेस्ट क्लब सेक्रेटरी पुरस्कार मिळवला आहे.२०१५ साली डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी म्हणून यशस्वीरित्या काम केले आहे.२०१५ साली पुणे येथे झालेल्या त्रैवार्षिक मेळाव्यात त्यांनी "भारत की गलियोसे" या उपक्रमातून सर्वांची वाह वाह मिळवली.
Comments