महिलांना लग्नाचे अमिष दाखवून हनी ट्रॅपमध्ये अडकवणारा भामटा गजाआड....
पनवेल, दि.8 (वार्ताहर) ः उच्च शिक्षीत महिलांना लग्नाचे अमिष दाखवून हनी ट्रॅप मध्ये अडकविणार्‍या भामट्याला एपीएमसी पोलिसांनी मालाड मालवणी येथून जेरबंद केले आहे. महेश उर्फ करण मनोज गुप्ता, (32 वर्षे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून तो एम ई ( कॉम्पुटर) उच्चशिक्षित तरूण असल्याचे पोलिसांनी सांगितले.
याबाबत हकीकत अशी की, दि. 29 जानेवारी 2021 रोजी एपीएमसी पोलिस ठाणे हद्दीतील हॉटेल एजंट जॅक पामबीच गॅलेरीया मॉल येथुन यातील फिर्यादी महिला ह्या उबेर कॅबने आरोपीसह वाशीहून बेलापुर येथे जाण्यासाठी निघाल्या असता, आरोपीने सदर महिलेशी जवळीक करून लगट करण्याचा प्रयत्न केल्याने त्यास त्यांनी विरोध केला असता, आरोपी मनोज गुप्ता याने सदर महिलेस अश्‍लील शिवीगाळी करण्याचा प्रकार केला होता. याबाबत महिलेने दिलेल्या तक्रारीवरून एपीएमसी पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात भादंवि कलम 354 (अ), 504 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरचा गुन्हा महिला अत्याचाराचा असल्याने पोलिस आयुक्त बिपीनकुमार सिंह, सह पोलिस आयुक्त डॉ.जय जाधव व पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी विशेष प्रयत्न करून सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत पोलिसांना सुचना केल्या होत्या. त्यानुसार एपीएमसी पोलिसांनी तांत्रिक तपास करून आणि गोपनीय बातमीदार यांच्या आधारे सदर गुन्हयातील आरोपी महेश उर्फ करण मनोज गुप्ता, (32 वर्षे), शिक्षण- एम ई ( कॉम्पुटर ) यास मालाड मालवणी येथून ताब्यात घेवुन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, आरोपीने गुन्हा कबुल केल्याने त्यास नमुद गुन्ह्यात अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता, त्याला 4 दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे. दरम्यान, आरोपी महेश उर्फ करण मनोज गुप्ता, हा जीवनसाथी या मेट्रोमोनीयल वेबसाईटवर करण या टोपन नावाने अकाउंट तयार करून त्यात स्वत:ला बिजनेसमॅन असल्याचे भासवुन तो उच्च शिक्षीत महिलांना लग्ना बाबत मागणी घालत असे. व त्यानंतर महिलांनी त्याच्या मोबाईल नंबरवर संपर्क साधल्यानंतर त्यांना तो पब, मॉल, रेस्टोरंट याठिकाणी भेटायला बोलावुन जवळीक साधत संबंध वाढवत असे. तसेच आरोपी याने नामांकीत कंपनीत डाटा ऑपरेटरचे काम केलेले असुन आरोपीला सॉफ्टवेअरचे नॉलेज असल्याने तो वारंवार आपले मोबाईल सीम बदली करण्यासह एकदा वापरलेले सीम परत वापरत नसे. यासह तो स्वत:च्या मोबाईल सीमचे नेट न वापरता सर्व्हेर युज करून स्वत:च्या मोबाईल फोन व्दारे ओला उबेर हे वाहन बुक न करता इतर नावाच्या सीम कार्डचा वापर करत असे. आरोपीला संगणकाचे सविस्तर ज्ञान असल्यामुळे सदर ज्ञानाचा चुकीच्या ठिकाणी वापर करत असल्याच्या आदी विविध बाबी आतापर्यंतच्या पोलिस तपासातून उघड झाल्या असून सदर आरोपीने अशाप्रकारे अजून किती महिलांना फसविले आहे याबाबतचा अधिक तपास एपीएमसी पोलिसांकडून सुरु आहे.


फोटो ः आरोपी महेश उर्फ करण मनोज गुप्ता
Comments