विमानतळाला स्व.दि बा.पाटील यांचेच नाव दिले जावे,न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील - बाळासाहेब पाटील - कोकण म्हाडा मा.सभापती
पनवेल :- नव्याने होऊ घातलेल्या नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्यासाठी स्थानिक प्रकल्प ग्रस्त,नागरिक हे अत्यंत आक्रमक असून आपल्या भावना आणि मागणी सरकार दरबारी मांडण्यासाठी कृती संघर्ष समितीच्या वतीने विशाल असे ‘मानवी साखळी आंदोलन’ करण्यात आले. स्थानिक भूमिपुत्र नागरिक,हजारो भाजपा कार्यकर्ते, सर्वपक्षीय कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते व त्यांनी आपल्या भावना तीव्रपणे मांडल्या.
या आंदोलनात कोकण म्हाडा मा.सभापती बाळासाहेब पाटील व भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा मा.उपमहापौर विक्रांत पाटील हे शेकडो कार्यकर्त्यांसह सहभागी झाले होते.
याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना मा.बाळासाहेब पाटील म्हणाले की,  स्व.दि.बा.पाटील हे निःश्ययाचा महामेरू होते. शेतकऱ्यांच्या कल्याणाचा एखादा विषय ठरवला तर तो मार्गी लावायचाच हा त्यांचा संघर्षशील स्वभाव होता.अनेक कार्यक्रम आणि आंदोलने यात स्व.दि.बा.पाटील साहेबांचा मला सहवास लाभला आणि त्यांच्याबरोबर मी काम करू शकलो हे माझे भाग्य असल्याचे त्यांनी सांगितले.बाळासाहेब पाटील यांनी पुढे सांगितले की, स्व.हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे हिमालयाइतक्या उंचीचे नाव आहे तसेच ते उभ्या महाराष्ट्रासाठी अस्मितेचा विषय आहेत. त्यांचं नाव महाराष्ट्रातील अनेक महत्त्वपूर्ण उपक्रमाला देता येऊ शकते,तसेच समृध्दी महामार्गाला त्यांचे नाव दिले गेलेले आहे,परंतु हे विमानतळ ज्या जागेत उभे राहत आहे तो संपूर्ण विभाग हा स्व.दि.बा.पाटील यांची कर्म भूमी आहे, त्यांच्या संघर्षामुळे आज या विभागाचा विकास झाला आहे. इंग्रज काळापासून सुरू असलेल्या जमीन अधिग्रहण कायद्याला छेद देत शेतकरी विकासात भागीदार असला पाहिजे ही संकल्पना त्यांनी मांडली आणि देशात पहिल्यांदा १२.५% मोबदला देण्याचा कायदा अस्तित्वात आला. आज या कायद्याला आदर्श मॉडेल म्हणून पाहिले जाते, त्यामुळे अश्या संघर्षशील नेत्याचेच नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिलं जावं ही आग्रही मागणी आम्ही करीत आहोत.
याविषयी बोलताना भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील म्हणाले की,स्व.दि.बा.पाटील हे एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते,त्यांनी त्यांच्या असाधारण कार्यातून या विभागातील तमाम युवा पिढीच भवितव्य उज्वल करण्याचे काम केले आहे.आज या विभागातील शेतकऱ्यांचा जो विकास झालेला दिसतो तो केवळ आणि केवळ स्व.दि.बा.पाटील यांच्यामुळेच.सिडको ने कवडीमोल भावाने शेतकऱ्यांच्या जमिनी गिळल्या होत्या परंतु स्व.दि.बा.पाटील साहेबांना दूरदृष्टी होती,त्यांना सिडको करणार असलेली नफाखोरी माहीत होती म्हणून शेतकऱ्यांनाही याचा फायदा व्हावा आणि फसवणूक थांबावी यासाठी त्यांनी या विरोधात संघर्ष उभा करून शेतकऱ्यांना गेलेल्या जागेच्या बदल्यात १२.५ %विकसित भूखंड मिळवून दिले.महविकास आघाडी ने उगाचच राजकारण न करता खाल्या मिठाला जागल पाहिजे आणि ज्यांच्यामुळे आमदार,खासदार झाले महत्त्वाच्या पदांवर पोहोचले त्यांच्या नावाला विरोध न करता समर्थन दिले पाहिजे असेही मत विक्रांत पाटील यांनी व्यक्त केले.त्यामुळे जो पर्यंत स्व.दि.बा.पाटील यांचे नाव विमानतळाला दिले जात नाही तोपर्यंत आमचा हा संघर्ष सुरूच राहील असे ही त्यांनी सूचित केले.
या मानवी साखळी आंदोलनात मा.लोकनेते मा. खा. रामशेठ ठाकूर, मा.आमदार प्रशांत ठाकूर, कोकण म्हाडा मा. सभापती. मा.बाळासाहेब पाटील,पनवेलच्या महापौर डॉ.सौ.कविता ताई चौतमोल,भारतीय जनता युवा मोर्चा चे प्रदेश अध्यक्ष तथा पनवेल महापालिकेचे मा. उपमहापौर मा. विक्रांत पाटील यांच्यासह अनेक नगरसेवक,लोकप्रतिनिधी,स्थानिक प्रकल्पग्रस्त नागरिक व भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Comments