२४ जूनच्या आंदोलनाची जय्यत तयारी; दिबांच्या नावासाठी आम्ही केंद्रातही जाणार .....







पनवेल(प्रतिनिधी) रविवारी मुंबईत झालेल्या बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हट्टामुळे दुसऱ्या फेरीची चर्चाही फिसकटली आहे. त्यामुळे लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाला त्यांचा विरोध असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांनी घेतलेली हि भूमिका प्रकल्पग्रस्त, भूमिपुत्र आणि प्रकल्पग्रस्त गावांवर अन्यायकारी आहे. मुख्यमंत्र्यांच्या या हेकेगिरी भूमिकेला आमचा प्रखर विरोध असून प्रकल्पग्रस्ताचे लोकनेते स्व. दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी घोषित करण्यात आलेले २४ जून रोजीचे सिडको घेराव आंदोलन कोणत्याही परिस्थितीत होणारच आहे, अशी रोखठोक भूमिका लोकनेते  दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीने आज (दि.२१ जून) येथे आयोजित करण्यात पत्रकार परिषदेत प्रसार माध्यमांसमोर मांडली.आंदोलन दडपण्यासाठी पोलीस प्रशासन अँक्शन मोडवर असेल तर आम्ही रिअँक्शन मोडवर असणार आहोत, असा खणखणीत आवाजही कृती समितीने दिला आहे. 

पनवेलमधील महात्मा ज्योतिबा फुले सभागृह (आगरी समाज हॉल) येथे आज सायंकाळी ०४ वाजता पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषेदस कृती समितीचे अध्यक्ष दशरथदादा पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सल्लागार माजी खासदार जगन्नाथ पाटील, माजी खासदार डॉ. संजीव नाईक, कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार गणपत गायकवाड, कॉ भूषण पाटील, काँग्रेसचे प्रदेश सचिव संतोष केणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे गुलाबराव वझे, पनवेल महानगरपालिकेचे उपमहापौर जगदिश गायकवाड, जे. डी. तांडेल, दीपक म्हात्रे, भाजपचे युवा नेते दशरथ भगत, कामगार नेते सुरेश पाटील, सामाजिक कार्यकर्ता रुपेश धुमाळ, दीपक पाटील, राजेश गायकर, सीमा घरत, यांच्यासह विविध संस्था संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. 

यावेळी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगण्यात आलेली कि, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरणासंदर्भात रविवारी (दि. २०) मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेली लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीची चर्चेची दुसरी फेरीही मुख्यमंत्र्यांच्या हट्टामुळे फिसकटली. मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून न घेता ते बैठकीतून एकदा उठून गेले. त्यामुळे काहीही झाले तरी ‘दिबां’च्या नावासाठी आम्ही माघार घेणार नाही, असा निर्धार सर्वपक्षीय कृती समितीने व्यक्त केला. कृती समितीच्या शिष्टमंडळाचे ऐकून न घेता, चर्चा न करताच मुख्यमंत्री बैठकीतून निघून गेल्याने सर्वपक्षीय कृती समितीने २४ जूनचे आंदोलन कोणत्याही परिस्थितीत करणारच, असा निर्धार केला आहे. भूमिपुत्र, शेतकरी, प्रकल्पग्रस्त, कष्टकर्‍यांचे झुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला देण्यात यावे, या मागणीसाठी लोकचळवळ उभी राहिली आहे. सर्व स्तरांतून तिला पाठिंबा मिळत आहे. खरंतर ही मागणी सन २००८ पासूनची आहे. असे असतानाही राज्यातील ठाकरे सरकारने शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव या विमानतळाला देण्यात येईल, असे जाहीर केले असून तसा ठराव राज्याचे नगरविकासमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिडकोमार्फत करून घेतला आहे. त्यास रायगड, ठाणे, मुंबई, पालघर जिल्ह्यांतील ‘दिबा’प्रेमी नागरिकांचा तीव्र विरोध आहे. हा असंतोष १० जून रोजी मानवी साखळी आंदोलनातून स्पष्टपणे दिसून आला. तरीही शिवसेनेचे नेते हे बाळासाहेब ठाकरे यांचेच नाव विमानतळाला देण्यात येईल, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे. दरम्यान २४ जूनच्या आंदोलनाच्या धसक्यामुळे आंदोलन दडपण्यासाठी पोलिसांनी परवानगी नाकारली आहे त्याचबरोबर नोटिसा बजावण्याचे तर दुसरीकडे दिबासाहेबांच्या नावाला विरोध करणारे विविध क्लुप्त्या करत जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत, मात्र त्यांचा हा डाव यशस्वी होणार नाही, असे सांगून दिबासाहेबांच्या नावासाठी कितीही विरोध झाला तरी हे आंदोलन होणारच, असेही लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीने यावेळी स्पष्ट केले. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तयारी संदर्भात पत्रकारांच्या प्रश्नांवर उत्तर देताना हे आंदोलन किमान ०१ लाख लोकांचा 'भूतो न भविष्यतो' असे असणार आहे, पोलीस शासन आंदोलन रोखण्यासाठी अथक प्रयत्न करणार मात्र आमचीही तशी तयारी झाली आहे. दिबांचे नाव विमानतळाला मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहणार आहे, असेही यावेळी समितीच्यावतीने सांगण्यात आले. आणि २४ जूनच्या घेराव आंदोलनात पुढील आंदोलनाची भूमिका मांडण्यात येईल, असेही यावेळी कृती समितीच्यावतीने जाहीर करण्यात आले.

पत्रकारांना अधिक माहिती देताना कृती समितीचे उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी म्हटले की, नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी बोलाविलेल्या बैठकीत आम्ही सर्वपक्षीय कृती समितीने विमानतळाला दि. बा. पाटील यांच्या नावाचा आग्रह धरला, मात्र चर्चा सुरू होण्यापूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विमानतळाव्यतिरिक्त दुसरे कुठे नाव सुचवायचे असेल तर सुचवा, असे म्हटले, पण आम्ही आताही ‘दिबां’च्या नावावर ठाम असल्याचे स्पष्ट केले. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी तुम्ही असा आग्रह धरत असाल तर आमचे शिवसैनिकही रस्त्यावर उतरतील, असे सांगितले. एकीकडे त्यांनी आपल्या पक्षाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात ममता बॅनर्जी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी पश्चिम बंगालमध्ये अस्मिता जपण्याचे उचललेले पाऊल अभिनंदनीय असल्याचे म्हटले आणि दुसरीकडे मात्र ते पनवेल, उरण, रायगडसह कोकणची जनता जी अस्मिता जपतेय तिला नाकारतात. ‘दिबां’साहेबांच्या नावासाठी २७ सूचना गेलेल्या असताना तुम्ही नाव सुचविले नाही, सरकारने नाव सुचविले नाही, असे सांगता. वास्तविक सिडकोकडे प्रकल्पग्रस्तांच्या व त्यांच्या संघटनांच्या अनेक सूचना गेलेल्या आहेत. सिडको संचालक मंडळात ठराव झाला नाही हा पुढचा भाग आहे. तो या विमानतळाचे काम पूर्ण होईल तेव्हा करता येईल, पण म्हणून एवढ्या लवकर नामकरण उरकून घेणे योग्य नाही. दरम्यान, २४ जूनच्या सिडको घेराव आंदोलनाची जोरदार तयारी पूर्णत्वास आली असून, त्या अनुषंगाने घेण्यात येत असलेल्या विभागनिहाय बैठकांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्याचे दिसून येत आहे. ‘आमच्या मनानं घेतलाय ठाव, विमानतळाला दिबांचंच नाव!,’ अशी ठाम भूमिका ‘दिबा’प्रेमी जनतेने घेतली आहे. किमान एक लाख लोकांचा या आंदोलनात सहभाग असणार आहे. शांततापूर्ण स्वरूपात हे आंदोलन केले जाणार असून त्या दृष्टीने नियोजन व तयारी केली  आहे. लोकनेते     दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानळाला देण्याच्या मागणीसाठी भूमिपुत्र एकवटले आहेत. ‘दिबां’ची अस्मिता जपण्यासाठी सर्व भेद बाजूला करून सज्ज होऊ या, असे आवाहन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले. तसेच पुढे म्हणाले की, प्रशांत ठाकूर, महेश बालदी व गणपत गायकवाड या तिन्ही आमदारांनी पोलीस आयुक्तांना स्पष्ट शब्दांत सांगितले की, आम्हाला अडवायचा प्रयत्न केल्यास आम्ही आत्मदहनाची वेळ आली तरी मागे हटणार नाही. आम्ही आंदोलनस्थळी जाणारच आणि तुम्ही जाऊ दिले नाही, तर रस्त्यात जे काही होईल त्यास शासन व पोलीस जबाबदार असतील, असेही ठणकावले आहे. ठाकरे सरकारच्या भूमिकेमुळे लोकं चिडलेली असून दिबासाहेबांच्या नावासाठी जनता जनता रस्त्यावर उतरणार आहे, आणि दिबासाहेबांच्या नावासाठी आम्ही केंद्रातही जाणार आहोत, असेही त्यांनी अधोरेखित केले. 

मुख्यमंत्र्यांनी लोकभावना समजून घेणे क्रमप्राप्त -दशरथ पाटील

नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाशिवाय दुसरा पर्याय नाही, असे आम्ही मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा स्पष्टपणे सांगितले. यावरून त्यांचा संताप झाला आणि ते बैठकीतून निघून गेले. ही बाब बरोबर नाही. त्यांनी लोकभावना समजून घेतल्या पाहिजेत. सरकारनेही याचा गांभीर्याने विचार करावा. 

मुख्यमंत्री बैठकीतून निघून गेले हे महाराष्ट्रातील पहिले उदाहरण -जगन्नाथ पाटील  
मुख्यमंत्री बैठकीतून निघून गेले हे महाराष्ट्रातील पहिले उदाहरण आहे. १९६० साली राज्याची स्थापना झाली. त्या वेळी मुख्यमंत्री झालेले यशवंतराव चव्हाण ते देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत कुणीही राज्यातील एखाद्या प्रकल्पाला आपल्या आई-वडिलांचे नाव द्यावे, असे सांगितलेले नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनीही आपल्या पिताश्रींच्या नावाचा आग्रह धरू नये.

मुख्यमंत्री धमकी देतात हा लोकनेते दि. बा. पाटील व त्यांच्या कार्याचा अपमान  -आमदार प्रशांत ठाकूर
२४ जूनचे आंदोलन करायचे हा आपला निर्धार पक्का आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र तुम्ही आंदोलन करीत असाल, तर शिवसैनिकही रस्त्यावर उतरतील, अशी भाषा केली. अशा प्रकारे मुख्यमंत्री धमकी देतात हा लोकनेते दि. बा. पाटील व त्यांच्या कार्याचा अपमान आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता याविरोधात रस्त्यावर उतरेल. पोलिसांच्या आडून हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होईल, पण आपण ठाम राहायला हवे. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सर्वांचे आराध्य दैवत आहेत. महाराजांच्या नावाने मुंबईत विमानतळ आहे. एका विमानतळाला नाव असताना तांत्रिकदृष्ट्या तेच नाव दुसऱ्या विमानतळाला देता येणार नाही. दिबासाहेबांच्या नावासाठी आज आम्ही मनसे प्रमुख राज ठाकरे यांची आम्ही भेट घेतली त्यावेळी त्यांनी त्यांची भूमिका महाराजांच्या नावाची मांडली आहे.  

 घेराव आंदोलनातून महाराष्ट्र सरकारची झोप उडविण्यासाठी सज्ज राहा. - आमदार महेश बालदी
सर्वपक्षीय कृती समितीत जे ठरेल ते निर्देश आपल्याला पाळायचे आहेत. पोलिसांनी आंदोलनाला जाऊ नका, गुन्हे दाखल होतील, असे म्हटले आहे, पण श्रद्धेय दि. बा. पाटील यांच्यामुळे आपल्याला चांगले दिवस दिसले. म्हणूनच घेराव आंदोलनातून महाराष्ट्र सरकारची झोप उडविण्यासाठी सज्ज राहा. 

‘दिबा’विरोधकांना आणि सरकारला त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे.  -आमदार गणपत गायकवाड
मुख्यमंत्र्यांनी लोकभावना लक्षात घेतल्या पाहिजेत, मात्र ते बैठकीतूनच उठून गेले. आता भूमिपुत्रांनी आपली अस्मिता जपण्यासाठी एकत्र आले पाहिजे. सरकार आपले आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करेल, पण आपण ठाम राहिले पाहिजे. नाहीतर पुढील पिढीला अपमानित जीवन जगावे लागेल, न्याय्य हक्कांसाठी झगडावे लागेल. हीच ती वेळ आहे की आपण ‘दिबा’विरोधकांना आणि सरकारला त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे.

दि. बा. पाटील साहेबांनी जनतेची अहोरात्र सेवा केली आहे. सामान्य माणसाचा आवाज त्यांनी बुलंद केला आहे. त्यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला मिळाला पाहिजे आणि तो सर्व समाजाचा हक्क आहे तो मिळालाच पाहिजे - संतोष केणे- सचिव- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस 

सिडकोच्या दारातच वटपौर्णिमा साजरी करणार - महिला मंडळांचा पुढाकार 
भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्तांचे दि. बा. पाटील यांच्या स्मृतिदिनी २४ जूनला सिडकोला घेराव घालण्यात येणार आहे. ज्येष्ठ आणि तरुणाची फौज या आंदोलनात महत्वाची भूमिका पार पाडत असताना महिलाही मागे राहिल्या नाहीत. २४ जूनला योगायोगाने याच दिवशी वटपौर्णिमा आहे. असे असले तरी भूमिपुत्र सावित्रींनी यंदाची वटपौर्णिमा या आंदोलनात साजरी करण्याचा निर्धार केला आहे. आणि या लढाईच्या अनुषंगाने आपल्या सौभाग्याला अधिक बळ देण्यासाठी सिडकोच्या दारातच वटपौर्णिमा साजरी करणार असून नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचा नाव मिळेपर्यत या संघर्षात महिलांचाही सहभाग राहणार आहे.  आणि तशीही तयारी महिला मंडळाकडून जोरदार सुरु आहे. 

शिवसेनेची दुटप्पी भूमिका
लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावासंदर्भात विषय निघाला तर शिवसेनेचे रायगड जिल्हा सल्लागार बबन पाटील आणि जिल्हाध्यक्ष शिरीष घरत म्हणतात की, तुम्ही केंद्रात जाऊन केंद्र सरकारकडून दि. बा. पाटील यांचे नाव मंजूर करून आणा. आमचा त्याला पाठिंबा असेल, मात्र हीच मंडळी सिडकोने केलेल्या ठरावाला पाठिंबा देतात आणि राज्य सरकारकडे सिडकोच्या ठरावाचा आग्रह धरतात. म्हणजे एका बाजूला सांगायचे तुम्ही दिल्लीला जाऊन नाव मंजूर करा आणि दुसर्‍या बाजूला यांनी सिडकोकडून ठराव करून आमच्या पायात पाय घालायचा. हे असे उद्योग का करता? आम्ही तर दि. बा. पाटील यांचे नाव मंजूर करून घेऊच. कारण आमच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत, असेही सर्वपक्षीय कृती समितीने ‘दिबा’विरोधी मंडळींना सुनावले आहे.
Comments