नवी मुंबई विमानतळाला माजी खासदार लोकनेते दि बा पाटील साहेबांचेच नाव लागले पाहिजे....
सामाजिक कार्यकर्ते अतुल अनंताशेठ भोईर यांची ठाम भूमिका

पनवेल :- सिडको आस्थापना च्या वतीने उभारण्यात येत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव कुणाचे द्यावे? याचा वाद सध्या भलताच चिघळला आहे. प्रकल्पग्रस्त आणि भूमिपुत्र मात्र नवी मुंबई विमानतळाला माजी खासदार लोकनेते दि बा पाटील यांचेच नाव देणार या भूमिकेवर ठाम आहेत. तर दुसरीकडे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सिडकोच्या खांद्यावर बंदूक ठेवत सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा ठराव पारित करायला लावला आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे प्रकल्पग्रस्त आणि भूमिपुत्रांच्यात प्रचंड रोष निर्माण झाला आहे. येत्या 24 जून रोजी दि बा पाटील साहेबांच्या जयंती दिनी प्रकल्पग्रस्त आणि भूमिपुत्रांनी सिडकोच्या मुख्यालयाला घेराव घालण्याचे ठरविले आहे. या पार्श्‍वभूमीवर आमच्या प्रतिनिधीने सामाजिक कार्यकर्ते अतुल भोईर यांची प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणाले की,नवी मुंबई विमानतळाला माजी खासदार लोकनेते दि बा पाटील साहेबांचेच नाव लागले पाहिजे.
       ते पुढे म्हणाले की, सत्तरच्या दशकामध्ये सिडको येथे आल्यानंतर त्यांनी आम्हा भूमिपुत्रांच्या जमिनी अक्षरशा कवडीमोल किमतीने घेण्याचे आरंभिले होते. त्यावेळेस जर दि बा पाटील साहेब यांनी आक्रमक होत आंदोलने पुकारली नसती तर आम्हाला ऐश्वर्याचे दिवस पाहायला मिळाले नसते. त्यांच्या अभ्यासू लढ्या मुळेच साडेबारा टक्के विकसित भूखंड परतावा देण्याचे तत्व संपूर्ण देशात प्रस्थापित झाले. आमच्या उदरनिर्वाहाचे साधन हरवल्यानंतर भूमिहीन झालेल्या त्या शेतकऱ्याला त्याचा परिपूर्ण मोबदला देण्यासाठी पाटील साहेबांनी केलेले कार्य अतुलनीय आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील कारावास असेल, बहुजन समाजाच्या जनगणनेसाठी घेतलेली आग्रही भूमिका असेल, किंवा स्त्री भ्रूण हत्या थांबविण्यासाठी कायदा पारित करण्यासाठी घेतलेली भूमिका असेल लोकनेते दि बा पाटील यांच्या अभ्यासू, लढवय्या, आक्रमक, परखड व्यक्तिमत्त्वाची ओळख संपूर्ण देशाला झालेली आहे. आमच्या जमिनींवर जर विमानतळ होत असेल तर त्याला नाव सुद्धा आमच्याच नेत्याचे लागले पाहिजे.
Comments