फार्मासिस्टची फसवणूक...
फार्मासिस्टची फसवणूक

पनवेल, दि.3 (वार्ताहर) ः कोव्हीडमुळे काही दुकानदार वस्तू घरपोच आणून देत असल्याची संधी साधून एका ठकसेनाने पनवेल मधील एका फार्मासिस्टला औषधे आणि काही वस्तू खोट्या पत्यावर आणण्यास सांगून त्याच्याजवळ असलेली 5150 रोख रक्कम घेऊन पलायन केल्याची घटना घडली आहे. या ठकसेना विरोधात खांदेश्‍वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सदर प्रकरणातील तक्रारदार तरुण शुभम पाटील (21) विचुंबे येथे राहण्यास असून तो पनवेल रेल्वे स्टेशन समोरील जेनरिक मेडीको या दुकानात फार्मासिस्ट म्हणून कामाला आहे. सध्या कोव्हीड-19 साथरोग चालू असल्याने फोनवरुन औषधे मागविणार्‍यांना या मेडीकल दुकानातून घरपोच औषधे पोहोचविण्यात येतात. याचाच फायदा उचलत एका ठकसेनाने डॉ.लिना मोरे बोलत असल्याचे भासवून या मेडीकलच्या मोबाईलवर संपर्क साधला होता. त्यानंतर सदर महिलेने 2851 रुपयांच्या वस्तू मागवून तिच्याकडे दोन हजाराच्या नोटा असल्याचे फार्मासिस्टला सांगितले. तसेच येताना आणखीन 4 हजार रुपयांचे सुट्टे पैसे घेऊन येण्यास सांगितले. त्यानुसार शुभम पाटील सदर महिलेने मागविलेल्या वस्तू आणि दुकानाच्या गल्ल्यातील 5150 रुपये घेऊन तिच्याकडून 8 हजार रुपये आणण्यासाठी साई प्लाझा इमारतीत गेला. त्यानंतर शुभम पाटील याने डॉ. लिना मोरे या महिलेला संपर्क साधून त्यांच्या फ्लॅट नंबरची विचारणा केल्यानंतर महिलेने ए विंग मध्ये 301 रुम नंबर असल्याचे आणि त्यांचे पती पार्किंगमध्ये असल्याचे सांगून त्यांच्याकडे वस्तू आणि रक्कम देण्यास सांगितले. याचदरम्यान ए विंगमधून आलेल्या ठकसेनाने रुम न.101 जवळ शुभमला नेऊन त्याच्याकडून 5150 रुपये घेतले. त्यानंतर त्याने डॉ. लिना मोरे 301 मध्ये राहण्यास असून त्यांना वस्तू देऊन येण्यास सांगितले. त्यानुसार शुभम 301 रुममध्ये वस्तू देण्यास गेला असता, त्याठिकाणी डॉ.लिना मोरे ऐवजी दुसरीच महिला राहत असल्याचे त्याला समजले. त्यामुळे तो पुन्हा रुम नं.101 मध्ये आला असता त्याठिकाणी त्याच्याकडून पैसे घेणारा व्यक्ती नसल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे शुभमच्या लक्षात आल्यानंतर त्याने खांदेश्‍वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
Comments