नगरसेवक विकास घरत यांच्या आक्रमकतेमुळे सिडकोची त्वरित कामाला सुरुवात..
पनवेल, दि. २९ (वार्ताहर) :-  कामोठे वसाहतीमधील सेक्टर 34 मधील नागरिकांना अनेक समस्या भेडसावत आहेत.येथील सांड पाणी वाहून नेणार्‍या वाहिन्या जीर्ण झाल्याने टाक्या मलमुत्राने ओसंडून वहात आहेत.याची तक्रार करून सुध्दा समस्या जैसे थे असल्याचे पाहून नगरसेवक विकास घरत आक्रमक झाले होते व रहिवाशांच्या सह थेट सिडको कार्यालयात धडक देत त्यांनी अधिकार्‍यांना फैलावर घेताच कामे मार्गी लागली असून सिडकोचे अधिकारी व कर्मचारी आता प्रत्यक्ष रस्त्यावर उतरुन कामे करू लागली आहेत.
सांड पाण्याच्या टाक्या सेक्टर 34 परिसरात वाहत असल्याने अतिशय दुर्गंधी पसरलेली होती. त्यावर घोंगावणाऱ्या माशा आणि 24 तास वाहणारे सांडपाणी यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला होता. हेच पाणी पिण्याच्या पाण्यात देखील मिसळते त्यामुळे रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला होता. 

याशिवाय येथील चेंबरची झाकणे नाहीशी झाली आहेत, पदपथ अपूर्ण अवस्थेत होती. अशा सगळ्या समस्यांसाठी नागरिकांनी तक्रारी करून, नगरसेवक विकास घरत यांनी पाठपुरावा करून देखील कामे होत नसतील तर त्यांना रुद्रावतार धारण करावा लागला. काही दिवसापूर्वी येथील समस्याग्रस्त नागरिकांना घेऊन त्यांनी कामोठे सिडको कम्युनिटी सेंटरमध्ये कार्यकारी अभियंता विलास बनकर यांची भेट घेतली होती. आठ दिवसात नवीन पाईप टाकण्याचे काम सुरू होईल.तोपर्यंत जेट मशीन,आणि सक्शन मशीन द्वारे टाक्या साफ केल्या जातील, असे आश्‍वासन त्यांनी दिले होते. व त्या आश्‍वासनाची पुर्तता करत सिडकोने प्रत्यक्ष कामाला सुरूवात केल्याने स्थानिक रहिवाशांनी नगरसेवक विकास घरत यांचे आभार मानले आहेत.

Comments