पनवेल, दि. १२ (संजय कदम) ः दुचाकी व मोबाईल चोरीच्या गुन्हयांमध्ये अलिकडच्या काळात अल्पवयीन मुलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढला असल्याच्या घटना पोलिस तपासातून समोर येत असल्याने समाजासाठी ही निश्चिच धोक्याची बाब आहे. ताज्या घटनेत, नवी मुंबई गुन्हेशाखा मध्यवर्ती कक्षाच्या पोलिसांनी दोघा अल्पयीन गुन्हेगारांना जेरबंद करून नवी मुंबईतील विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीत या दुकलीने केलेले सात दुचाकी व सहा मोबाईल चोरीचे असे एकूण 13 गुन्हे उघडकीस आणत एकूण चार लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमालही जप्त केला आहे.
नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत दुचाकी व मोबाईल चोरीसह इतर गुन्हयांच्या घटनांत वाढ झाल्याची बाब लक्षात घेवून पोलिस आयुक्त बिपीनकुमार सिंह, अपर पोलीस आयुक्त डॉ. बी.जी. शेखर पाटील यांनी विशेष मोहीम राबवुन कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. त्याअनुषंगाने गुन्हे शाखेचे पोलीस उप आयुक्त प्रविणकुमार पाटील व सहायक पोलीस आयुक्त विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती कक्षाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथकाने मोहीम हाती घेतली असतांनाच, दुचाकी व मोबाईल चोरणारे दोघे अल्पवयीन मुले उलवे भागात येणार असल्याची माहिती मध्यवती कक्षाचे पोलीस अंमलदार लक्ष्मण कोपरकर व राहुल वाघ यांना खबर्याकडून मिळाली होती. त्यानुसार सदरठिकाणी सापळा लावून सदर दोघा मुलांना पोलिस पथकाने ताब्यात घेवून त्यांच्याकडे मिळून आलेल्या दुचाकीबाबत विचारपुस केली असता, त्यांनी सदरची दुचाकी पनवेल शहर येथुन चोरी केल्याचे कबुली दिली. यानंतर त्यांच्याकडे पथकाने अधिक चौकशी केली असता, सदर दोघांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील पनवेल, पनवेल तालुका, खांदेेशर, न्हावाशेवा, खारघर,रबाळे व उरण या सात पोलीस ठाण्याच्या हद्दीतुन 8 मोटार सायकली चोरी केल्याची कबुली दिल्याने सदर दोघांकडून पोलिसांनी सुमारे 3 लाख 30 हजार रुपयांच्या 7 मोटार सायकली हस्तगत करण्यात आल्या. तसेच तपासादरम्यान या दुकलीकडून पोलिसांनी सुमारे 95 हजारांचे 6 महागडे मोबाईल फोन हस्तगत केले असून सदरचे मोबाईल या दोघांनी नवी मुंबईतील उलवे, सानपाडा, खारघर, कळंबोली व वाशी या परिसरातुन स्नॅचिंग केल्याचे कबूल केले. यावरून या दुकलीकडून पोलिसांनी दुचाकी व मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस आणत एकूण 4 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमालही हस्तगत केला असून या दुकलीकडून अजूनही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत असून त्यादृष्टीने अधिक तपास सुरु आहे. मध्यवर्ती कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन.बी.कोल्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय राजेश गज्जल, पीएसआय संजय पवार, पोलीस अंमलदार सतिश सरफरे, अतिश कदम, लक्ष्मण कोपरकर, राहुल वाघ, शशिकांत शेंडगे, विष्णु पवार, मेघनाथ पाटील, सतिश चव्हाण आदींच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.
फोटो ः गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाने ताब्यात घेतलेली अल्पवयीन मुले वाहनांसह