दि.बा.पाटील यांच्या नावासाठी माझ्यावर गुन्हा दाखल होणे हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण ; राजेन्द्र पाटील....

पनवेल / वार्ताहर :- नवी मुंबई विमानतळाला माजी खासदार लोकनेते दि बा पाटील यांचे नाव देण्यासाठी करण्यात येणाऱ्या आंदोलनाच्या नियोजनाबाबत बैठक आयोजित केल्याबद्दल मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र महादेव पाटील यांच्यावर एन आर आय पोलीस ठाण्याच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भा द वी अनुसार कलम 188 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना राजेंद्र पाटील म्हणाले की दि बा पाटील साहेबांच्या साठी होणाऱ्या आंदोलनात पहिला गुन्हा अंगावर घेण्याचा सन्मान मला प्राप्त झाला ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. आमचे उद्धारकर्ते असणाऱ्या दि बा पाटील साहेबांचे नाव नवी मुंबई विमानतळाला देण्यासाठी असे अनेक गुन्हे अंगावर घ्यायला लागले तरी बेहत्तर.
          
याबाबत सविस्तर हकीकत अशी की 24 जून रोजी दि बा पाटील यांच्या जयंतीच्या औचित्याने प्रकल्पग्रस्त व भूमिपुत्र नवी मुंबई विमानतळाला दिबांचे नाव देण्यासाठी सिडको कार्यालयाला घेराव घालणार आहेत. या आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी राजेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली वहाळ, बामणडोंगरी, मोरावे, जावळे, गणेशपुरी आणि उलवे नोड येथील नागरिकांच्या साठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. कोरोना कालखंडाचे कारण पुढे करत स्थानिक पोलिस स्टेशन ने या सभेसाठी आक्षेप नोंदवत राजेंद्र पाटील यांना नोटीस पाठवली होती. पोलिसांचा सन्मान ठेवत राजेंद्र पाटील यांनी मोठी सभा न घेता उपस्थितांना आवाहन करून थोडक्यात बैठक पार पाडली. वास्तविक 24 जून च्या आंदोलनासंदर्भात ठिकठिकाणी बैठका होत असून देखील गुन्हा मात्र केवळ राजेंद्र पाटील यांच्यावरच दाखल झाल्याने नागरिकांच्यातून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

चौकट
पोलिसांनी सद्सद्विवेक बुद्धीने काम करावे की सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करावे हा त्यांचा प्रश्न आहे. माझ्यासाठी मात्र प्रकल्पग्रस्तांचे कैवारी आणि भूमिपुत्रांचे दैवत असणाऱ्या दि बा पाटील साहेबांच्या साठी अंगावर गुन्हा घेणे ही अभिमानाची बाब वाटते.
राजेंद्र पाटील
संचालक
मुंबई(महाराष्ट्र)कृषी उत्पन्न बाजार समिती.

चौकट
पोलिसांची तिरकी चाल
राजेंद्र पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर त्याचे स्पष्टीकरण देण्या बाबत त्यांना पोलिस स्थानकात पाचारण करण्यासाठी 24 जून रोजी सकाळी दहा वाजता चा मुहूर्त पोलिसांनी शोधला आहे. याच दिवशी याच वेळी प्रकल्पग्रस्त बांधव आंदोलन करणार असल्यामुळे राजेंद्र पाटील यांनी आंदोलनात जाऊ नये यासाठी पोलिसांनी तिरकी चाल खेळल्याची चर्चा सर्वत्र रंगत आहे.
Comments