तौत्के चक्री वादळात कामोठ्यातील मच्छी मार्केट उध्वस्त ....

८५ मच्छी विक्रेत्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर : शासनाने नुकसान भरपाई देण्याची मागणी 
पनवेल :- काल झालेल्या तौत्के चक्री वादळामुळे कामोठे येथील मैदानावर येथील स्थानिक प्रकल्पग्रस्त मच्छी विक्रेत्यांनी स्वखर्चाने उभारलेले मार्केट अक्षरशः उध्वस्त झाले आहे. त्यामुळे येथे व्यवसाय करीत असलेल्या मच्छी विक्रेत्यांवर मोठे संकट ओढवले आहे. 
हे मार्केट उभे करण्यासाठी येथील स्थानिक भूमिपुत्र असणार्‍या मच्छी विक्रेत्यांनी प्रत्येकी 5 हजार वर्गणी काढून येथे बांबू आणी ताडपत्रीची निवारा शेड उभारली होती. त्याचप्रमाणे येथे विजेची व्यवस्था देखील करण्यात आली होती. 
मात्र काल झालेल्या तौत्के चक्रीवादळात ही शेड जमिनदोस्त झाली. त्याचबरोबर मच्छी विक्रेत्यांचे फ्रिज,मच्छी साठवण्यासाठी वापरण्यात येणारे थर्माकाॅल चे डब्बे याचे नुकसान झाले असून त्यात ठेवलेली हजारो रुपयांची मच्छी खराब झाली आहे. 
या प्रचंड नुकसानीमुळे येथील मच्छी विक्रेत्यांवर आता उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यामुळे आता आमच्या नुकसानीचे पंचनामे करुन आम्हाला त्वरित भरपाई द्यावी अशी मागणी येथील जय हनुमान रोजबाजार मच्छी मार्केट चे अध्यक्ष बबलु गोवारी यांनी केली आहे.
Comments