बनावट नंबर प्लेट लावणार्‍या ट्रेलर चालकास अटक....

पनवेल, दि. २१ (वार्ताहर) ः ट्रेलरवर असलेले बँकेचे कर्ज चुकविण्यासाठी आपल्या ट्रेलरवर दुसर्‍याच ट्रेलरवरील नंबरप्लेट लावून शासनाची फसवणूक करणार्‍या ट्रेलर चालकाला कळंबोली वाहतूक पोलिसांनी पकडले. राम गोविंद निसाद असे या ट्रेलर चालकाचे नाव असून कळंबोली पोलिसांनी त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. तसेच त्याचा ट्रेलर देखील जप्त केला आहे.
या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या राम गोविंद निसाद हा कळंबोलीतील रोडपाली येथे राहाण्यास असुन त्याचे त्याच भागात गॅरेज आहे. राम गोविंद याने काही वर्षापूर्वी बँकेकडून कर्ज घेऊन ट्रेलर विकत घेतला होता. मात्र सदर ट्रेलरचे हप्ते थकल्याने बँकेकडून त्याच्या ट्रेलटरवर जप्तीची कारवाई होण्याची त्याला भिती होती. त्यामुळे ट्रेलरवरील बँकेचे हप्ते चुकविण्यासाठी राम गोविंद निसाद याने आपल्या ट्रेलरवर दुसर्‍याच ट्रेलरवरील नंबर प्लेट लावला होता. सदर बनावट नंबरप्लेट लावून तो मागील सहा महिन्यापासून आपला व्यवसाय करत होता. दरम्यान, रोडपाली भागातील एक ट्रेलर चालकाने आपल्या ट्रेलरवर बनावट नंबरप्लेट लावून आपली गाडी चालवित असल्याची माहिती कळंबोली वाहतूक शाखेतील पोलीस शिपाई दीपक गायकवाड यांना मिळाली होती. त्यानुसार वाहतूक पोलिसांनी रोडपाली येथे जाऊन संशयित ट्रेलरचा चालक राम गोविंद निसाद याच्याकडे चौकशी केली असता, त्याने सदर ट्रेलरचा मालक तोच असल्याचे सांगितले. मात्र ट्रेलर बाबत अधिक माहिती देण्यास त्याने टाळाटाळ केली. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी त्याच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर त्याने ट्रेलरवर बँकेचे कर्ज असल्याने सदरचे कर्ज चुकविण्यासाठी सदर ट्रेलरवर बनावट नंबर प्लेट लावल्याचे कबूल केले. तसेच त्याने जासई येथे उभ्या असलेल्या ट्रेलरवरील नंबरप्लेट लावल्याचे सांगितल्यानंतर वाहतूक पोलिसांनी संबंधित ट्रेलर चालकाला बोलवून त्याला देखील याबाबतची माहिती दिली. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी राम गोविंद निसाद याला कळंबोली पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानुसार पोलिसांनी राम गोविंद विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली. तसेच बनावट नंबरप्लेट लावून तो वापरत असलेला ट्रेलर जप्त केला.
Comments