पनवेल, दि.7 (संजय कदम) ः बेकायदेशीररित्या देशी दारु जवळ बाळगून त्याची विक्री करणार्या एका इसमास पनवेल तालुका पोलिसांनी ताब्यात घेवून त्याच्याकडून मुद्देमाल हस्तगत केला आहे.
तालुक्यातील नवकार लॉजिस्टीक लेबर कॅम्प कसळखंड या ठिकाणी एक इसम बेकायदेशीररित्या देशी दारुची विक्री करीत असल्याची माहिती पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वपोनि रवींद्र दौंडकर यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गोडसे, पोलीस उपनिरीक्षक भरत पाटील, पोलीस हवालदार संतोष चिकणे आदींच्या पथकाने सदर ठिकाणी छापा मारुन कुंदन किशोर सिंग (36) याला ताब्यात घेवून त्याच्याकडून संत्रा देशी दारुच्या बाटल्या व इतर ऐवज हस्तगत केला असून त्याच्यावर महाराष्ट्र प्रोव्हीविशन अॅक्ट कलम 65 ई अंतर्गत कारवाई केली आहे. गेल्या काही दिवसापासून पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या विशेष पथकामार्फत वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारे अवैधरित्या व्यवसाय करणार्यांवर धडक कारवाई करण्यात येत असल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.