नवी मुंबई विमानतळाला नाव 'दिबासाहेबांचेच' पाहिजे ; पनवेल तालुका पत्रकार विकास मंचचा कृती समितीला जाहीर पाठिंबा
पनवेल(प्रतिनिधी) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे, अशी आग्रही भूमिका घेण्यात आली आहे. त्या अनुषंगाने लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीने पुढाकार घेतला असून या कृती समितीच्या भूमिकेला पनवेल तालुका पत्रकार विकास मंचने पाठिंबा जाहीर केला आहे. त्यासंदर्भात आज (दि. २७) लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचे उपाध्यक्ष लोकनेते रामशेठ ठाकूर यांची सदिच्छा भेट घेऊन पाठिंबा निवेदन दिले. विशेष म्हणजे लोकनेते दि. बा. पाटील यांचे विमानतळाला देण्यासंदर्भात पाठिंबा देणारी क्रियाशील पत्रकारांची पहिली संघटना आहे.  
यावेळी पनवेल तालुका पत्रकार मंचचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील,  अविनाश कोळी, विवेक पाटील, संजय कदम, मंदार दोंदे, हरेश साठे, नितीन कोळी, प्रविण मोहोकर, राजू गाडे, दीपक घोसाळकर, अनिल भोळे, अनिल कुरघोडे,  आदी मंचाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. 
मंचाच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, आपल्या विभागात होऊ घातलेल्या नवी मुंबई विमानतळास माजी खासदार लोकनेते दिनकर बाळू पाटील यांचे नाव देण्याबाबत आपण जे आंदोलन पुकारले आहे या आंदोलनास पनवेल तालुका पत्रकार विकास मंच ही संस्था जाहीर पाठिंबा प्रकट करत आहे. आमची संस्था ही नोंदणीकृत संघटना असून आपण करत असलेल्या आंदोलनातील प्रत्येक घडामोडीला उचित प्रसिद्धी देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असू. प्रकल्पग्रस्तांचे कैवारी आणि भूमिपुत्रांचे दैवत अशी प्रतिमा असणाऱ्या लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव विमानतळाला दिले गेले पाहिजे ही आमची भूमिका असून, दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळास देण्यासाठी आपले आंदोलन कितीही तीव्र झाले तरी आम्ही आपल्या सोबत खंबीर पणाने उभे राहू, अशी ग्वाहीही देण्यात आली असून शेवटी, विमानतळाला नाव दिबांचे! नाही कुणाच्या बापाचे!! असेही अधोरेखित करण्यात आले आहे. 
यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सांगितले कि, लोकनेते दि. बा. पाटील यांच्यामुळे शेतकरी, स्थानिक, प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळाला आहे. सर्व समाजासाठी दिबांसाहेबांनी काम केले आहे. त्यांचे नवी मुंबई विमानतळाला नाव देण्याची आमची कायम भूमिका राहिली आहे. त्या अनुषंगाने सर्वोतपरी प्रयत्न सुरु आहेत. २४ जूनच्या आंदोलनाची जोरदार तयारी सुरु आहे. त्यासाठी आम्ही प्रत्यक्ष नियोजनासाठी पनवेल, नवी मुंबई, ठाणे, पालघर, कल्याण, वसई, मुंबई या ठिकाणी बैठका घेत आहोत. फक्त आगरी, कोळी, कुणबी, कराडी समाजच नाही तर संपूर्ण ओबीसी, एसटी, एसी अशा सर्व समाजाने या लढ्याला पाठींबा देऊन आंदोलनात उतरण्याची तयारी केली आहे. पाच हजार वकिलांची फौज या आंदोलनाला ताकद देणार आहेत, त्याचप्रमाणे पत्रकारही या लढ्यात सहभाग घेत आहे, याचा मला आनंद आहे. त्याबद्दल पनवेल तालुका पत्रकार विकास मंचचे आभार व्यक्त करतो. 

Comments