दोन ट्रेलरमध्ये चिरडल्या गेलेल्या पार्किंग मधील कामगाराचा मृत्यू


पनवेल, दि.19 (वार्ताहर) ः ट्रेलर चालकाने 40 फुटी ट्रेलर पार्क करताना निष्काळजीपणे ट्रेलर  पाठीमागे घेतल्याने ट्रेलरच्या पाठीमागे उभा असलेला पार्किंगमधील कामगार दोन ट्रेलरमध्ये चिरडला गेल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पनवेल मधील मोठा खांदा गाव येथील पार्किंगमध्ये घडली. या घटनेनंतर सदर ट्रेलर चालक पळून गेला असून कामोठे पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला आहे. 
पनवेल मधील मोठा खांदागाव येथे जेएनपीटी रोड लगत पार्किंग असून या पार्किंगमध्ये ट्रेलर व मोठी वाहने पार्क केली जातात. त्यासाठी सदर पार्किंगमध्ये कामगार ठेवण्यात आले आहेत. या पार्किंगमध्ये असलेले कामगार पार्किंगसाठी येणार्‍या वाहनांचे फोटो काढून सदर वाहने व्यवस्थीत पार्क करुन घेतात. 40 फुटी ट्रेलर या पार्किंगमध्ये आला होता. सदरचा ट्रेलर पार्क करण्यासाठी तेथील कामगार नयन पाटील (20) हा ट्रेलर सोबत गेला होता. यावेळी नयन पाटील ट्रेलर चालकाच्या मदतीने ट्रेलर पार्क करुन घेण्यासाठी ट्रेलरच्या पाठीमागे गेला होता. याचवेळी ट्रेलर चालकाने निष्काळजीपणे सदर ट्रेलर वेगाने पाठीमागे घेतला. त्यामुळे नयन पाटील हा पाठीमागे उभा असलेला ट्रेलर व पार्किंगसाठी आलेला 40 फुटी ट्रेलर या दोन्ही वाहनांमध्ये चिरडला जाऊन गंभीर जखमी झाला. हा प्रकार ट्रेलर चालकाच्या लक्षात आल्यानंतर त्याने याबाबतची माहिती तेथील इतर कामगारांना न देता आपल्या ताब्यातील ट्रेलर घेऊन त्याठिकाणावरुन पलायन केले. यावेळी नयन पाटील हा त्याठिकाणी जखमी अवस्थेत पडल्याचे इतर कामगारांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी जखमी नयनला तत्काळ एमजीएम हॉस्पीटलमध्ये दाखल केले. मात्र त्याठिकाणी उपचारादरम्यान, नयनचा मृत्यू झाला. या घटनेनंतर कामोठे पोलिसांनी पळून गेलेल्या ट्रेलर चालकावर गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे.
Comments