पनवेल, दि.24 (वार्ताहर) ः कळंबोली वसाहतीमधील पाणी चोरी रोखण्यासाठी व पाण्याच्या वापराप्रमाणे देयके वितरित व्हावीत यासाठी जलमापके बसविण्यात आली याचे रहिवाशीनी स्वागत केले पण सदोष जलमापकामुळे नागरिकांवर जास्तीची देयके लादली जात आहेत त्यामुळे त्यांच्यात तीव्र नाराजी आहे. तेव्हा ही सदोष जलमापके बदलण्यात येवून रहिवाशींना जास्तीची बिले देण्याचे थांबवावे व खराब जलमापके खरेदी केली आहेत त्याची चौकशी करून जबाबदार अधिका-यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेना पनवेल उपमहानगर समन्वयक आत्माराम गावंड यांनी सहायक अभियंता सिडको यांच्याकडे लेखी निवेदनाने केली आहे.
कळंबोली वसाहती मधील रहिवाशांनी 2005 साली आलेल्या महापूरापासून संरक्षण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात बैठ्या घरांची वाढीव बांधकामे केली आहेत. वाढीव बांधकामाने सिडकोच्या निकृष्ठ बांधकामाना मजबूतआली आहे. त्यामुळे स्लाप पडण्याच्या घटना कमी झाल्या आहेत. तर वसाहतीच्या लोकसंख्येत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. 40 वर्षापुर्वीचेच पाणी पुरवठा व्यवस्थापन असल्याने ते कोलमडून पडले आहे . परिणामी, लोकसंख्या नक्की किती, पाण्याची गरज किती, याचा ताळमेळ लावणे सिडकोला कठीण झाले आहे . एका विभागाचे पाणी पळवून दुसर्या विभागाची तहान भागवण्याची कसरत सिडकोला करावी लागत होती. याचा सर्वाधिक फटका एल.आय.जी.या अल्प उत्पन्न गटातील बैठ्या घरातील रहिवाशांना बसत आहे. कळंबोली वसाहतीला कमी दाबाने होणारा पाणी पुरवठा, अपुरे पाणी मिळणे, गढूळ, दुषित पाणी या संदर्भात अनेक वेळा चर्चा केली आहे . त्याच बरोबर कळंबोलीची लोकसंख्या लक्षांत घेता 37 दशलक्ष लिटर पाण्याची गरज असताना 27 दशलक्ष लिटर इतकाच पुरवठा होतो. त्यातही गळतीचे प्रमाण 4 ते 5 टक्के आहे. या संदर्भात लक्ष वेधले असता,आपण शहरासाठी वाढीव पाण्याची मागणी केली आहे असे सांगीतले होते. रोज 32 दशलक्ष लिटर पाणी मिळाले तरी टंचाईची समस्या ब-यापैकी दूर होईल, असा आपण दावा केला आहे . पाणी पुरवठ्यात सिडकोचे आर्थिक नुकसान होत आहे. यावर उपाय म्हणून शहरात जलमापके बसविण्यात आली आहेत याचे जनतेतून स्वागत करण्यात आले पण बसविण्यात आलेली जलमापके सदोष असल्याने रहिवाशीना जास्तीचे देयके देण्यात येत आहेत. त्यामुळे अगोदरच कोरोनाच्या महामारीत जगणे मुश्किल केलेले असताना त्यात वाढीव बिलाने नागरिकात तीव्र नाराजी आहे तेव्हा ती बदलण्यात येवून नागरिकाना पाण्याच्या वापराप्रमाणे बीलं देण्यात यावीत व सदोष जलमापके खरेदी बाबत चोकशी करून जबाबदार अधिका-यांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेना पनवेल उपमहानगर समन्वयक आत्माराम गावंड यांनी सिडकोचे सहायक अभियंता गणेश चंदणकार ( पाणी पुरवठा विभाग) यांच्याकडे लेखी निवेदनाने केली आहे. या बाबत चंदणकार यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्याचे टाळले.