नोकरीला लावतो सांगून दोघांची केली दहा लाखांची फसवणूक...

नवीन पनवेल : नोकरीला लावतो असे सांगून दोघांची दहा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीं विरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
       
टाटा मेमोरियल सेंटर, खारघरमध्ये उपमुख्य सुरक्षा अधिकारी म्हणून काम करत असलेले राजन मोतीराम चव्हाण हे त्यांना प्राप्त झालेल्या तक्रारींची चौकशी करण्याचे काम करतात. 2016 मध्ये टाटा मेमोरियल सेंटर कडून ए ग्रेड नर्स या पदाची जाहिरात काढण्यात आली होती. यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. यातून 27 उमेदवारांची निवड करण्यात आली. त्यावेळी  23 उमेदवार ग्रेड ए नर्स या पदावर हजर झाले. भरती प्रक्रिया पार पडल्यानंतर जानेवारी 2020 मध्ये ए ग्रेड नर्स या पदाच्या भरती प्रक्रियेमध्ये भ्रष्टाचार झाल्याबद्दल भरत धोंडे यांनी टाटा मेमोरियल सेंटर यांच्या मेलवर  तक्रार केली होती. त्यानुसार चव्हाण यांनी धोंडे यांच्याकडे चौकशी केली असता येथील कर्मचारी आणि युनियनचा पदाधिकारी किरण पाटील याने उमेदवारांकडून पैसे घेऊन भरती केली असल्याची माहिती देण्यात आली. 23 उमेदवारांपैकी आरती वैभवकुमार पोवार आणि आरती सतीश कुंडेला (आरतीजुट्टू) यांच्याकडून किरण प्रकाश पाटील यांनी नोकरी लावून देतो असे सांगून प्रत्येकी पाच लाख म्हणजे दहा लाख रुपये घेतले. मात्र किरण पाटील याने कोणत्याही परीक्षेचा पेपर किंवा कौशल्य चाचणीचा तपशील दिला नव्हता. तसेच त्या दोघांना पैसे परत न करता नोकरीला देखील लावले नाही. त्यामुळे टाटा मेमोरियल सेंटर येथील लॅब टेक्निशियन किरण प्रकाश पाटील (राहणार खारघर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 
Comments