वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन रुग्णालय संख्या वाढवा - सभागृहनेते परेश ठाकूर
पनवेल(प्रतिनिधी) खारघरमधील कोविड बाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन कोविड उपचार रुग्णालयांची संख्या वाढविण्यात यावी, अशी मागणी पनवेल महानगरपालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांनी आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 
     खारघरमध्ये कोविड उपचारासाठी रुग्णालयांची वाढ करण्यासंदर्भात नगरसेवक शत्रुघ्न काकडे यांनी सभागृहनेते नेते परेश ठाकूर यांना निवेदन दिले होते. त्या अनुषंगाने सभागृहनेते परेश ठाकूर यांनी आयुक्त सुधाकर देशमुख यांनी कार्यवाहीसाठी निवेदन दिले आहे. 
         त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, कोरोना महामारीच्या लाटेत संपूर्ण देशात व राज्यात हाहाकार माजला आहे. राज्य सरकारने कडक निर्बंधासह लॉक डाउन जाहीर केला आहे. आपल्या पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील परिस्थिती काही वेगळी नाही. याच क्षेत्रातील खारघर विभागात एप्रिल महिन्यापासून दररोज सरासरी १६०च्या वर कोविड रुग्णांची भर पडत आहे. आजच्या तारखेला पंधराशेच्या जवळपास अॅक्टिव रूग्ण आहेत. यातील अनेकांना व्हेंटिलेटर, आयसीयू व ऑक्सिजन बेडची आवश्यकता भासते. आजमितीस खारघरमध्ये फक्त पाच हॉस्पिटलला कोविड रुग्णालय म्हणून परवानगी मिळाली आहे. भविष्यातील धोक्याचा विचार करता आणखी पाच हॉस्पिटलांना परवानगी दिली तर ऑक्सिजन व्हेंटिलेटर आयसीयू बेडची व्यवस्था सर्वांना होऊ शकते. त्यामुळे याचा गांभीर्याने विचार करून संबंधित विभागाला कार्यवाहीचे आदेश देण्यात यावेत, असेही सभागृहनेते परेश ठाकूर यांनी निवेदनात अधोरेखित केले आहे. 
Comments