विनापरवाना रस्ता खोदकाम केल्याप्रकरणी गुन्हा दाखल .....
विनापरवाना रस्ता खोदकाम केल्याप्रकरणी गुन्हा दाखल 

पनवेल / वार्ताहर : कोणतीही परवानगी न घेता बीएसएनएलची केबल टाकण्याकरता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यावर खोदकाम केल्याप्रकरणी ठेकेदारावर पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
          सार्वजनिक बांधकाम विभागाचा रस्ता दांड फाटा, तूराडे- आपटा, खारपाडा राज्यमार्ग क्रमांक 107 हा मुख्य रस्ता आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता धनाजी टिळे हे दिघाटी- केळवणे येथे जात असताना त्यांना रस्त्यावर खोदकाम करीत असल्याचे दिसून आले. खारपाडा टोल नाका, मुंबई गोवा हायवे पासुन उजव्या बाजूला आपटा गावाच्या दिशेने सात किमीचा मुख्य डांबरी रस्ता आणि साईड पट्टीचे खोदकाम केलेले असून ते बुजवून 100 मीटर खोदून बीएसएनएलचे केबल टाकण्याचे काम चालू होते. यावेळी खोदकाम करणार्‍या कामगारांकडे चौकशी केली असता ठेकेदार फारुख बागेवाडी यांचे केबल टाकण्याचे काम सुरू असल्याचे समजले. त्याने पीडब्ल्यूडी खात्याची रस्ता खोदकाम करण्याची परवानगी घेतली नाही. त्यामुळे मुख्य डांबरी रस्ता आणि साईड पट्टी खोदून अंदाजे तीन लाख रुपयांचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे नुकसान केले आहे. रस्त्याचे नुकसान करून वाहतुकीस अडथळा आणि धोका निर्माण होईल अशा स्थितीत खोदकामाचे साहित्य आणि काम करताना दिसून आले म्हणून बीएसएनएलचे ठेकेदार फारुक बागेवाडी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Comments