खारघर सेक्टर - ३५ मधील रस्ते चिखलमय ; नागरिक संतप्त
पनवेल, दि. २४ (वार्ताहर) ः  महानगर गॅस वाहिनी टाकण्यासाठी केलेल्या खोदकामुळे खारघर सेक्टर-35 मधील रस्ते चिखलमय झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.
खारघर सेक्टर -34, 35 मधील रस्ते खड्डेमय झाल्यामुळे येथील रहिवाशांनी खारघर येथील सिडको कार्यालयात आंदोलन केल्यावर पाच वर्षांनंतर रस्त्याचे डांबरीकरण झाले. त्यात खारघर परिसरात घरोघरी गॅस जोडणीसाठी रस्ते खोदकाम करुन गॅसवाहिनी टाकण्याचे काम सुरु आहे. सदर काम 15 मे पूर्वी करुन रस्ते दुरुस्ती करणे आवश्यक होते. मात्र, गॅसवाहिनी टाकण्याचे काम झाल्यावर रस्ते दुरुस्ती न करता ‘रस्ते जैसे थे’ ठेवण्यात आल्याने रस्ते चिखलमय झाले असून, नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. खारघर सेक्टर -34, 35 परिसरातील रस्ते खष्ेमय झाले होते. त्या विरोधात खारघर सेक्टर -34, 35 मधील नागरिकांनी खारघर येथील सिडको कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयात धरणे आंदोलने केल्यावर पाच वर्षानंतर रस्त्याचे डांबरीकरण झाले. गॅस जोडणी घरोघरी करणे महत्वाचे काम आहे. मात्र, सदर काम 15 मे पूर्वी रस्त्याचे काम पूर्ण करणे आवश्यक होते. परंतु, त्याकडे सिडको अधिकार्‍यांकडून दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. 
येत्या 31 मे पर्यंत खारघर सेक्टर -34, 35 मधील रस्ते दुरुस्तीचे काम पूर्ण न झाल्यास खारघर येथील सिडको कार्यालयात नागरिकांच्या वतीने आंदोलन केले जाणार आहे, असे खारघर सेक्टर -34, 35 मधील नागरिकांनी सांगितले. दरम्यान, 16 मे नंतर अचानक वादळी वार्‍यासह पाऊस पडला. त्यामुळे खारघर सेक्टर -34, 35 मधील रस्ते दुरुस्तीचे काम झाले नाही. मात्र, 31 मे पर्यंत रस्ते दुरुस्तीचे काम पूर्ण केले जाणार आहे, असे खारघर येथील सिडको कार्यालयातील अधिकार्‍यांनी सांगितले. खारघर सेक्टर-35 वसाहतीच्या मध्यभागी असलेल्या नाल्यात परिसरातील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात डेब्रिज टाकले जात आहे. ‘सिडको’ने नाल्यात डेब्रिज टाकणार्‍या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी खारघर सेक्टर-35 मधील रहिवाशांकडून केली जात आहे.


फोटो ः चिखलमय रस्ते
Comments