विमानतळाला दिबांचेच' नाव हवे ; महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला होता ठराव

पनवेल(प्रतिनिधी) माजी विरोधी पक्षनेते, माजी खासदार, भूमिपुत्रांची अस्मीता असलेले प्रकल्पग्रस्तांचे नेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिलेच पाहिजे, हि भूमिका पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. या संदर्भात यापूर्वीच पनवेल महानगरपालिकेच्या जुलै २०१८ च्या सर्वसाधारण सभेत नवी मुंबई विमानतळाला लोकनेते स्वर्गीय दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा ठरावही सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे. 
      पनवेलकर जनतेच्या तसेच पनवेल परिसराच्या जडण घडणीमध्ये लोकनेते दि. बा. पाटील यांनी मोलाचे योगदान दिले आणि पनवेलला विशेष नावलौकिक प्राप्त करून दिला. त्यांनी पनवेलच्या विकासाकरिता व नियोजनाकरिता अत्यंत भरीव असे योगदान दिले आहे. त्यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा ठराव पनवेल महानगरपालिकेच्या १३ जुलै २०१८ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत तत्कालीन उपमहापौर चारुशिला घरत यांनी सभागृहात मांडला होता. हा ठराव घेण्यासंदर्भात सभागृहनेते परेश ठाकूर, नगरसेविका सुशिला घरत, दर्शना भोईर, कुसुम म्हात्रे, नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, अमर पाटील यांनी प्रस्ताव सूचना केली होती. त्यानुसार सभागृहात सर्वानुमते हा ठराव मंजूर करण्यात आला होता. मुंबई शहराला पर्याय म्हणून नवी मुंबई शहराची निर्मिती केली गेली. याकरिता हजारो शेतकऱयांची जमीन संपादित करण्यात आली. मात्र शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोलाने घेणाऱ्या सिडकोविरोधात दि. बा. पाटील यांनी यशस्वी लढा दिला. त्याचबरोबर देशाला साडेबारा टक्केचा नवा कायदा दिला. तसेच स्थानिकांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा अधिकार दिल्याने अशा नेत्याच्या त्यागाची दखल घेण्यासाठी विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा ठराव करण्यात आला. 
   नवी मुंबई विमानतळाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव नुकताच सिडको अस्थापनाच्या वतीने पारित करून तो राज्य शासनाकडे पाठविला. ही बातमी प्रसिद्ध होताच नवी मुंबई विमानतळ बाधित प्रकल्पग्रस्तांमध्ये तीव्र रोष उमटला आहे. दिबांचे नाव विमानतळाला देण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी आग्रही भूमिका मांडली आहे. त्याचबरोबर  कामोठे ग्रामस्थ मंडळाच्यावतीने पत्रकार परिषद आयोजित करून त्यात विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे अशी मागणी मांडण्यात आली. वेळ पडल्यास पराकोटीचा संघर्ष करत वाट्टेल ते मोल देण्याची तयारी ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे 'दिबांसाठी' काहीही पण करण्याची भूमिका प्रकल्पग्रस्त स्थानिकांनी घेतली आहे. 
Comments